पुणे : ‘निवृत्त सनदी अधिकारी भा. ई. नगराळे यांचे ‘संघर्ष’ हे आत्मकथन तरुण पिढीसाठी मार्गदर्शक आहे. कठीण परिस्थितीत संघर्ष करण्याची प्रेरणा या आत्मकथनातून मिळाली आहे. तरुण पिढीसाठी नगराळे यांचे आत्मकथन मार्गदर्शक ठरेल’, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी शनिवारी व्यक्त केले.
भा. ई. नगराळेलिखित ‘संघर्ष’ या आत्मकथनाचे प्रकाशन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हास पवार, राज्याचे निवृत्त मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डाॅ. रावसाहेब कसबे, निवृत्त सनदी अधिकारी विश्वनाथ शेगावकर, माजी आमदार मोहन जोशी या वेळी उपस्थित होते.
नगराळे हे ज्या समाजातून आले. त्या समाजाला करावा लागणारा संघर्ष या पुस्तकातून मांडण्यात आला आहे. जातिव्यवस्थेमुळे करावा लागणारा संघर्ष, संघर्षावर मात करून घेतलेले शिक्षण या बाबी आत्मकथनातून मांडण्यात आल्या आहेत. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांना आलेले अनुभव या आत्मकथनाच्या माध्यमातून मांडले आहेत. नगराळे यांचे आत्मकथन तरुण पिढीसाठी प्रेरणादायी आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.
बहुजन समाजातून प्रशासनात गेलेल्या अधिकाऱ्यांनी शासनाला लोकाभिमुख करण्याचे काम केले. नगराळे यांचे हे आंतरिक ऊर्मीतून लिहिलेले आहे,’ असे डाॅ. कसबे म्हणाले.नगराळे आणि माझा परिचय ४२ वर्षांपूर्वी झाला. अडचणीच्या वेळी धावून जाणारे नगराळे हे अधिकारी म्हणून लोकप्रिय होते. त्यांच्या कामाची दखल शासनाने घेतली,’ असे गायकवाड यांनी सांगितले.
आपण ज्या समाजातून आलो आहोत. त्या संघर्षाची माहिती नव्या पिढीला व्हावी. अडचणींवर मात करून ध्येय साधण्याची प्रेरणा मिळावी, या विचाराने हे आत्मकथन लिहिले आहे, अशी भावना नगराळे यांनी व्यक्त केली. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. डाॅ. सोनिया नगराळे यांनी आभार मानले.