पुणे : टोळक्याने शिवाजीनगर न्यायालयासमोरील तोफखाना भागात दहशत माजविली. टोळक्याने वैमनस्यातून दोन युवकांवर हल्ला केल्याची घटना घडली. खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी चौघांना अटक केली.

आदित्य बडसकर (वय २२), राेहन शिंदे (वय २३), अथर्व कदम (वय २४), प्रथम मोहिते (वय २१, सर्व रा. बहिरट आळी, शिवाजीनगर गावठाण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या चार ते पाच साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत समीर शेख (वय ४८, रा. तोफखाना, शिवाजीनगर) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख यांचा मुलगा आयान आणि पुतण्या फिरोज यांचा आरोपींशी वाद झाला होता.

वादातून आरोपी बडसकर, शिंदे, कदम, मोहिते हे साथीदारांसह शिवाजीनगर न्यायालयासमोरील तोफखाना भागात शनिवारी मध्यरात्री आले. त्यांच्याकडे तीक्ष्ण शस्त्रे होते. आरोपींनी या भागात दहशत माजविली. नागरिकांनी शिवीगाळ करून कोयते उगारले. शेख यांचा मुलगा आयान आणि फिरोज यांच्यावर कोयत्याने वार करून आरोपी पसार झाले. आरोपींनी पसार होताना या भागातील वाहनांच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे तोफखाना भागात घबराट उडाली. पसार झालेल्या आरोपींना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक पांढरे तपास करत आहेत.