पुणे : ‘मूलभूत संशोधन कार्य केलेले डॉ. जयंत नारळीकर यांनी विज्ञान सोप्या भाषेत सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले. त्यातून अनेक विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची गोडी निर्माण झाली आणि त्यांना प्रेरणा मिळाली. विज्ञानात फक्त सत्यच असले, तरी रंजनात्मक पद्धतीने मांडणी केल्यास आकलन सुलभ होते. हे ध्यानात घेऊन विज्ञानविषयक लेखन करणाऱ्यांनी डाॅ. जयंत नारळीकर यांचा कित्ता गिरवावा,’ अशी अपेक्षा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जी. डी. यादव यांनी शनिवारी व्यक्त केली.

डाॅ. जयंत नारळीकर यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा आणि नूतन अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या वतीने डाॅ. यादव यांच्या हस्ते संगणकतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर, डॉ. अविनाश भोंडवे (आरोग्य), डॉ. विनिता आपटे (पर्यावरण), डॉ. के. सी. मोहिते (भौतिकशास्त्र) यांचा जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्काराने गौरव करण्यात आला. त्या वेळी यादव बोलत होते. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अशोक जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभेचे अध्यक्ष सचिन ईटकर, रवींद्र डोमाळे, नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे प्राचार्य एस. एन. सपली या वेळी उपस्थित होते.

यादव म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्ता ही मानवी बुद्धिमत्तेवर कधीच मात करू शकणार नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता ही पूर्णत: मानवाने पुरविलेल्या माहितीवर अवलंबून असल्यामुळे चुकीची माहिती दिल्यास कृत्रिम बुद्धिमत्ता अयोग्य पद्धतीने माहितीचे विश्लेषण देऊ शकते. हा धोका लक्षात घेणे आवश्यक आहे. विज्ञान क्षेत्रात फक्त कृत्रिम बुद्धिमत्ताच नव्हे, तर सगळ्या विज्ञान शाखांचे महत्त्व आहे.’

जोशी म्हणाले, ‘डॉ. नारळीकर हे आमच्यासाठी दैवतासमान होते. आम्ही विकसित भारत निर्मितीसाठी प्रयत्नशील आहोत. डॉ. नारळीकर यांनी वैज्ञानिक संकल्पना सोप्या शब्दांत सामान्य वाचकांपर्यंत पोहोचवून त्यांच्यासाठी विज्ञानविषयक दालन खुले करण्याचे महान कार्य केले आहे.’
‘डॉ. जयंत नारळीकर यांनी प्रोत्साहित केल्यामुळे विविध शाळा, महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयी व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन करीत आहे,’ असे शिकारपूर यांनी नमूद केले.

डॉ. अविनाश भोंडवे, डॉ. विनिता आपटे, डॉ. के. सी. मोहिते यांनीही मनोगत व्यक्त केले. ईटकर यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.