Ghatasthapana 2022 Shubh Muhurt Navratri Puja: हिंदू कॅलेंडरनुसार, दरवर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून होते. दुर्गा अष्टमी व्रत, अष्टमी तिथीला कन्यापूजन, नवमी तिथीला महानवमी आणि दशमी तिथीला दसरा किंवा विजयादशमी हे सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. यंददा शारदीय नवरात्रोत्सवाच्या घटस्थापनेसाठी सोमवारी (२६ सप्टेंबर) पासून सुरुवात होत आहे. प्रतिपदेच्या दिवशी घटस्थापना किंवा कलश स्थापनेने दुर्गा देवीच्या विविध रूपांची पूजा सुरू होते. दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी  नवरात्रीच्या घटस्थापना मुहूर्ताबद्दल माहिती दिली आहे. दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत घटस्थापनेचा मुहूर्त आहे. सोमवारी ब्राह्म मुहूर्तापासून म्हणजे पहाटे पाच वाजल्यापासून दुपारी पावणेदोन वाजेपर्यंत घटस्थापना करून पूजन करता येईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- पुणे : जगातील सर्वांत मोठा संस्कृत विश्वकोश पाहण्याची संधी ; डेक्कन कॉलेजच्या संस्कृत आणि कोशशास्त्र विभागातर्फे उद्या खुला दिवस

दहाव्या दिवशी दसरा

नवरात्रोत्सवामध्ये शुक्रवारी (३० सप्टेंबर) ललिता पंचमी आहे. २ ऑक्टोबर रोजी महालक्ष्मी पूजन असून त्या दिवशी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. ३ ऑक्टोबर रोजी महाष्टमीचा उपवास करावयाचा आहे. ४ ऑक्टोबर रोजी नवरात्रोत्थापन म्हणजेच नवरात्र समाप्ती असून ५ ऑक्टोबर रोजी दसरा आहे, अशी माहिती दाते पंचांगकर्तेचे मोहन दाते यांनी दिली. सर्वसाधारणपणे नवरात्रोत्थापन आणि दसरा एका दिवशी येतात. मात्र, यंदा दसऱ्याच्या आदल्या दिवशी नवरात्रोत्थापन आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नऊ किंवा दहा दिवसांचा कालावधी असतो. तिथीच्या क्षय-वृद्धीमुळे असा फरक असतो. या वर्षी घटस्थापनेपासून नवव्या दिवशी नवरात्रोत्थापना असून दसरा दहाव्या दिवशी आहे.

हेही वाचा- “मला गृहमंत्री व्हायचं होतं. मात्र, वरिष्ठांनी…”; पुण्यातील मेळाव्यात अजित पवारांनी व्यक्त केली खंत

महालक्ष्मी पूजन (घागरी फुंकणे) या दिवशी मध्यरात्री अष्टमी तिथीवर देवीचे पूजन करण्याची प्रथा आहे. अशी अष्टमी २ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री आहे. त्यामुळे त्या दिवशी महालक्ष्मी पूजन दिलेले आहे. मात्र, दुर्गाष्टमी ३ ऑक्टोबर रोजी आहे. विजया दशमी म्हणजेच दसरा हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी विजय मुहूर्तावर अनेक जण आपल्या नवीन उपक्रमाची सुरुवात करतात. हा विजय मुहूर्त महाराष्ट्रामध्ये दुपारी २ वाजून २६ मिनिटे ते ३ वाजून ३१ मिनिटे या कालावधीत असल्याची माहिती दाते पंचागकर्ते मोहन दाते यांनी दिली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ghatasthapana 2022 shubh muhurt navratri puja vidhi know the exact date and time of establishment of kalash dpj