पुणेरी पाट्या हा कायमच चर्चेचा विषय आहे. या पाट्या कधी हसू आणतात, कधी वाटाही दाखवतात. अशात आता अनलॉक १ मध्ये पुण्यातल्या ग्राहक पेठेत स्वदेशी आणि विदेशीची पाट्या लावण्यात आल्या आहेत. अनेक ग्राहकांना स्वदेशी उत्पादनं कोणती आणि विदेशी उत्पादनं कोणती? हे समजत नाही. ते ग्राहकांना लक्षात यावं आणि त्यांनी जास्तीत जास्त स्वदेशी उत्पादनं घ्यावीत असं पुणे ग्राहक पेठेच्या एमडींनी म्हटलं आहे. भारतीय पदार्थ ग्राहकांनी जास्तीत जास्त घ्यावेत असाही आमचा उद्देश आहे. जेणेकरुन आत्मनिर्भर भारत या मोहिमेला हातभार लागेल असंही त्यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्याला ठाऊकच आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत या मोहिमेचा नारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील ग्राहकपेठेत असलेल्या सगळ्या स्टॉल्सवर स्वदेशी आणि विदेशी अशा पाट्या स्टिकर्स रुपाने लावण्यात आल्या आहेत. स्वदेशी वस्तू जास्त प्रमाणात खरेदी केल्या जाव्यात यासाठी आम्ही हे सुरु केल्याचं ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी स्पष्ट केलं. ग्राहकांना अनेकदा स्वदेशी वस्तूंची खरेदी करायची असते. मात्र स्वदेशी वस्तू कोणत्या ते ओळखता येत नाही. त्या वस्तू त्यांना ओळखता याव्यात आणि जास्तीत जास्त स्वदेशी वस्तूंच्या खरेदीला चालना मिळावी म्हणून आम्ही स्टिकर्स लावल्याचं त्यांनी सांगितलं.

सध्याच्या घडीला भारत आणि चीन या दोन देशांमधले संबंध तणावाचे झाले आहेत. एवढंच नाही तर चीन आणि अमेरिका यांचेही वाद चव्हाट्यावर आले आहेत. करोनामुळे चीनची प्रतिमा जागतिक पातळीवर डागाळली आहे. अशा सगळ्या प्रकरणात चीनमधल्या वस्तूंची खरेदी कमी व्हावी आणि भारतीय वस्तू यांची खरेदी वाढावी यासाठी प्रयत्न होताना दिसत आहेत. पुण्यातल्या ग्राहक पेठेत स्वदेशी आणि विदेशी अशा पाट्या लावण्यात आल्या आहेत. ग्राहक पेठेने कायमच स्वदेशी वस्तूंच्या वापराला आणि विक्रीला प्राधान्य दिलं आहे असंही पाठक यांनी स्पष्ट केलं.

 

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grahak peth a cooperative dept store in pune has labelled items as swadeshi and videshi scj