डॉक्टर व रुग्णालयांचे वेट अँड वॉचचे धोरण

वस्तू व सेवा करातून (जीएसटी) आरोग्य सेवेस वगळण्यात आले असले, तरी शस्त्रक्रिया व चाचण्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या किमती ३ ते ५ टक्क्य़ांनी वाढणार आहेत. त्यामुळे आता शस्त्रक्रिया व वैद्यकीय चाचण्या महागणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सध्या तरी ‘जीएसटी’बद्दल रुग्णालये व डॉक्टरांची भूमिका गोंधळलेपणाची असून अजून काही दिवस गेल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल, असे डॉक्टर सांगत आहेत.

‘जीएसटी लागू झाल्यानंतर स्थानिक संस्था कर (एलबीटी) बंद होणार आहे. तरीही जीएसटीच्या आरोग्य सेवेवरील परिणामांबद्दल आताच मत मांडता येणार नाही. जुलैअखेरीस काही निष्कर्ष काढता येईल,’ असे दीनानाथ रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. धनंजय केळकर यांनी सांगितले. रुग्णालयांना लागणारी मशीन्स महाग होणार असली, तरी त्यामुळे शस्त्रक्रियांचा खर्च वाढणार नाही, असे मत रुबी हॉल रुग्णालयाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी बोमी भोट यांनी मांडले.

‘गोळविलकर मेट्रोपोलिस’चे डॉ. अजित गोळविलकर म्हणाले, ‘‘चाचणी उपकरणांच्या किमती वाढणार असल्या, तरी वैद्यकीय चाचण्यांच्या किमती एका रात्रीत वाढणार नाहीत. तूर्तास या किमती वाढवण्याचा विचार नसून जीएसटीचे एकूण परिणाम लक्षात घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल.’’

सध्या डॉक्टरांच्या मनात अनेक शंका असून अनेकांना सनदी लेखापालांकडून वेगवेगळे सल्ले मिळत असल्याने गोंधळ आहे, असे ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’च्या (आयएमए) पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश मराठे यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘बाह्य़रुग्ण विभागाचे शुल्क, वैद्यकीय उपचार हे जीएसटीतून वगळण्यात आले आहे. परंतु रुग्णालये व क्लिनिक्सना येणाऱ्या इतर खर्चावर जीएसटी लागल्यास काही खर्च वाढू शकतील. रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्था किंवा रुग्णालयाने औषध दुकानास भाडय़ाने दिलेल्या जागेतील व्यवसाय अशा गोष्टींचा त्यात समावेश होऊ शकतो. ‘व्हेंटिलेटर’सारखी जीवरक्षक उपकरणे तसेच डोळ्यांच्या उपचारांमधील दृष्टिरक्षक (व्हिजन सेव्हिंग) उपकरणांच्या किमती न वाढणेच योग्य आहे.’’

आयुर्वेदिकऔषधेही वधारणार?

आयुर्वेदिक औषधेही करात वाढ झाल्यामुळे महागण्याची शक्यता ताराचंद रुग्णालयाचे विश्वस्त डॉ. सुहास परचुरे यांनी बोलून दाखवली. ‘तयार आयुर्वेदिक औषधे सोडून केवळ औषधी वनस्पतींवर (हर्बज्) कर किती वाढेल हे अजून स्पष्ट होत नाही,’ असे ते म्हणाले.

भविष्यात जीवरक्षक औषधांच्या किमती वाढण्याची शक्यता

वस्तू व सेवा कर आल्यामुळे लगेच औषधांच्या किमतींवर फरक पडणार नाही. परंतु कर्करोगासारख्या आजारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या जीवरक्षक औषधांवर आता ५ टक्के कर लागणार आहे. पूर्वी या औषधांवर मूल्याधारित कर नव्हता. त्यामुळे भविष्यात जीवरक्षक औषधांच्या ‘एमआरपी’ किमती वाढण्याची शक्यता आहे, असे औषधविक्रेत्यांच्या राज्यव्यापी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र सचिव अनिल बेलकर यांनी सांगितले. सर्जिकल साधनांच्या किमती स्थिर राहतील, परंतु सौंदर्यवर्धकांच्या किमतींवर पूर्वीच्या साडेतेरा टक्के कराच्या जागी २८ टक्के कर लागणार असल्याने त्या किमती वाढतील, असेही ते म्हणाले.