पुणे : पादचारी तरुणाला फरफटत नेणाऱ्या मोबाइल चोरट्यांना हडपसर पोलिसांनी अटक केली. चोरट्यांकडून दुचाकी, तसेच चोरलेला मोबाइल संच असा ७० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. गुन्हा केल्यानंतर पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी १०० ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले.
हेही वाचा >>> पुणे : मोटारीची काच फोडून पावणेतीन लाखांचा ऐवज चोरीला
मंथन त्रिलोक पवार (वय १९, रा. सर्वोदय कॉलनी, मुंढवा), रोहित किरण वाणी (वय २१), कृष्णा संजय वाणी (वय २०, दोघे रा. धायरकर वस्ती, मुंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. हडपसर भागातील भगीरथीनगर परिसरातून पादचारी तरुण रात्री निघाला होता. त्यावेळी दुचाकीवरुन आलेले चोरटे पवार आणि वाणी यांनी त्याच्या हातील मोबाइल संच चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. पादचारी तरुणाने दुचाकीवरील चोरट्यांना विरोध केला. दुचाकीस्वार चोरट्यांनी तरुणाला २०० ते ३०० मीटर अंतर फरफटत नेले.
हेही वाचा >>> मद्यपी रिक्षाचालकाचा बेदरकारपणा प्रवाशाच्या जीवावर; रिक्षा उलटून प्रवाशाचा मृत्यू
या घटनेत पादचारी तरुण जखमी झाला. तरुणाने आरडओरडा केल्यानंतर चोरटे पसार झाले. तरुणाने याबाबत हडपसर पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे, तपास पथकातील सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, कुंडलिक केसकर, चंद्रकांत रेजितवाड यांनी या भागातील १०० हून जास्त ठिकाणचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरणाद्वारे पोलिसांनी तपास करुन चोरट्यांचा माग काढला.
© The Indian Express (P) Ltd