पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यात बहुतांश भागात ३ ते ५ सप्टेंबर या कालावधीत पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे, त्याची वाटचाल मध्य भारताच्या दिशेने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ३ ते ५ सप्टेंबर हे तीन दिवस विदर्भ, मराठवाड्यात मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

हेही वाचा >>> पुण्यात ऑगस्टमध्ये पडला उच्चांकी पाऊस; जाणून घ्या, सरासरी पाऊस किती पडतो

गुजरात किनारपट्टीपासून केरळ किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्याचा वेग वाढून किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. घाटमाथ्यावरही पुन्हा पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात अधून – मधून पावसाच्या हलक्या सरींची शक्यता आहे.

दरम्यान, सौराष्ट्र, कच्छवर सक्रिय असलेले अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्राने अरबी समुद्रात प्रवेश केला आहे. त्याचे चक्रीवादळात रुपांतर होऊन ते ओमानच्या दिशेने झेपावेल. या चक्रीवादळाच्या राज्यातील हवामानावर कोणताही परिणाम होणार नाही. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यात सर्वदूर अधून – मधून हलक्या ते मध्यम सरी पडण्याचा अंदाज आहे. विदर्भ, मराठवाडा आणि किनारपट्टीवर पावसाचा जोर राहील, अशी माहिती हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.