पिंपरी-चिंचवडमधील आकुर्डीमध्ये दुसरा विवाह करण्याचा विचार करणाऱ्या पतीची सुपारी देऊन पत्नीने जीवघेणा हल्ला घडवला होता. हल्लेखोरांनी मिठाईलाल बरुड यांच्यावर तब्बल २० ते २१ वार केले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली असून शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आधीच मिठाईलालची पत्नी रत्ना बरुड, हल्लेखोर अमन पुजारी आणि शिवम दुबे यांना बेड्या ठोकलेल्या आहेत. या गुन्ह्यात आता हत्येचे कलम वाढणार असल्याची माहिती निगडी पोलिसांनी दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सविस्तर माहिती अशी की, मिठाईलाल आणि रत्ना बरुड या दाम्पत्याला तब्बल आठ मुली असून पैकी एका मुलीचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता. मिठाईलालला वंशाचा दिवा हवा असल्याने तो दुसरा विवाह करण्याच्या मनस्थितीमध्ये होता. रत्नाला सर्व मुलीच झाल्याने तो रत्नाचा मानसिक आणि शारीरिक छळ करायचा. मिठाईलाल हा दुसरा विवाह करण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती रत्नाला मिळाली आणि नोव्हेंबर महिन्यात पती मिठाईलाल याला ठार मारायचं असा प्लॅन सुरू झाला.

हेही वाचा – पुणे : ‘कोड ब्ल्यू’मुळे वाचले शेकडो जीव! ससूनमध्ये मागील सहा महिन्यांत पाचशे रुग्णांना जीवदान

मिठाईलालला ठार मारण्यासाठी शेजारीच असलेल्या सराईत गुन्हेगार अमन आणि शिवम या दोघांना पाच लाखांची सुपारी दिली, पैकी दोन लाख ३० नोव्हेंबर रोजी देण्यात आले. यानंतर योग्य वेळेची संधी साधून म्हणजेच दिनांक सात डिसेंबर रोजी रात्री नऊच्या सुमारास पत्नी रत्ना ही शतपावली करण्यासाठी गेल्यानंतर बेडरूममध्ये पती झोपल्याचं हल्लेखोरांना रत्नाने सांगितलं आणि हल्लेखोर शिवम आणि अमन यांनी मिठाईलाल याच्यावर धारदार शस्त्रांनी तब्बल २० ते २१ वार केले. गंभीर जखमी मिठाईलाल या घटनेत बचावला, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू झाले. पोलिसांनीदेखील तपासाची चक्रे फिरवत अमन आणि शिवम दोघांना ताब्यात घेतलं. घटनेत मिठाईलालची पत्नी रत्नादेखील असल्याचं तपासात समोर आलं. तिघांना बेड्या ठोकण्यात आल्या. दरम्यान, मिठाईलाल यांच्यावर गेल्या सात दिवसांपासून खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा शुक्रवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी आता हत्या घडवणे ही कलम वाढ होणार आहे, अशी माहिती निगडी पोलिसांनी दिली.

हेही वाचा – पुणे मेट्रो पुढे सरकेना! विस्तारित मार्गात अडचणींची मालिका

सात मुली झाल्या आई-वडिलाविना पोरक्या

पती आणि पत्नीच्या या वादामुळे बरुड दांपत्याला असलेल्या सात मुली मात्र आई-वडिलाविना पोरक्या झाल्या आहेत. आई जेलमध्ये तर वडिलांचाही मृत्यू झाल्याने या सात निष्पाप मुलींनी करायचं काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. वंशाचा दिवा हवा असल्याने मिठाईलाल हा दुसरा विवाह करण्याच्या मानसिकतेत होता. याच मानसिकतेने त्याला मृत्यूच्या दाढेत ओढले आहे. वंशाच्या दिव्यापायी एक सुखी कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In akurdi the wife involved in husband murder who was planning to remarry husband died kjp 91 ssb