पिंपरी : शहरातील नवीन, वाढीव, वापरात बदल अशा मालमत्तांचे खासगी संस्थेमार्फत सुरू असलेले सर्वेक्षण बिनचूक आणि योग्य व्हावे, यासाठी महापालिकेचे आता संस्थेवर लक्ष राहणार आहे. संस्थेमार्फत सर्वेक्षण योग्य झाले आहे, की नाही, याची महापालिकेच्या पथकामार्फत तपासणी केली जाणार आहे. यात विसंगती आढळल्यास संबंधित संस्थेवर कारवाई करण्यात येणार आहे. मालमत्ता कराची चुकवेगिरी टाळण्यासाठी हे सर्वेक्षण महत्त्वाचे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी-चिंचवड शहरात सद्य:स्थितीत सहा लाख ३० हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. मात्र, त्यानंतरही शहरात दोन लाखांच्या आसपास नोंदणी नसलेल्या, वाढीव, वापरात बदल केलेल्या मालमत्ता असल्याचा अंदाज आहे. यापूर्वी शहरात तीनदा मालमत्ता सर्वेक्षण करण्यात आले. मात्र, अपेक्षित नवीन मालमत्ता आढळल्या नाहीत. त्यामुळे प्रशासनाने अत्याधुनिक ड्रोनद्वारे मालमत्तांचे सर्वेक्षण हाती घेतले. स्थापत्य कन्सलटंट प्रा. लि. या संस्थेमार्फत सर्वेक्षण केले जात आहे. सर्वेक्षणात आढळणाऱ्या मालमत्ताधारकांना तत्काळ नोटीस देण्यात येत आहे. मालमत्ताधारकांना हरकती, सूचना घेण्याची संधी देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले जात आहे. मालमत्तांचे सर्वेक्षण बिनचूक आणि योग्य झाले आहे का, याची कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी करण्यासाठी शहरातील कोणत्याही भागातील मालमत्तांची निवड केली जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये किती टक्के पाणीगळती? पाण्याचे ऑडीट झाले का? वाचा…

काय तपासले जाणार?

  • संस्थेने मालमत्तांना योग्य क्रमांक दिले आहेत का?
  • अंतर्गत मोजमापे, वापराची माहिती योग्य घेतली आहे का?
  • सर्वेक्षणात एखादी मालमत्ता वगळली आहे का?

तीन जणांच्या पथकाकडून तपासणी

खासगी संस्थेने सर्वेक्षण केल्यानंतर विभागीय कार्यालयाचे सहायक मंडलाधिकारी, लिपिक, मुख्य लिपिक असे तीन जणांचे पथक मालमत्तांची अंतर्गत तपासणी करणार आहे. मूळ विभागीय कार्यालय वगळून उर्वरित विभागीय कार्यालयातील मालमत्ता सर्वेक्षण तपासणीचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे.

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत; ‘हे’ आहे कारण

मालमत्तांचे अचूक सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी संस्थेने सर्वेक्षण केल्यानंतर प्रशासनाकडूनही तपासणी केली जाणार आहे. सर्वेक्षणातील मालमत्तांची खातरजमा करण्यासाठी नेमलेल्या महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निष्काळजीपणा केल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल, असे महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pimpri inspection of unregistered properties also watch on survey to check property tax evasion pune print news ggy 03 css