पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने १२१ जणांची नऊ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी भालचंद्र महादेव अष्टेकर (रा. श्‍वेता कुंज अपार्टमेंट, साईबाबा मंदिराजवळ, वडगाव बुद्रुक) याच्याविरुद्ध फसवणूकीसह महाराष्ट्र ठेवीदारांचे वित्तीय संरक्षण ३ आणि ४ कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत विजयकुमार मुरलीधर घाटे (वय ५४, रा. खडकवासला) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी अष्टेकर याने साई इंडस मार्केटींग आणिमल्टी सर्व्हिसेस नावाने व्यवसाय सुरू केला होता. गुंतवणूकीवर ४ ते १५ टक्के व्याज देण्याचे आमिष त्याने घाटे यांना दाखविले होते. घाटे यांनी अष्टेकरला दहा लाख रुपये गुंत‌वणुकीसाठी दिले. घाटे यांच्यासह अनेकांनी अष्टेकर याच्या व्यवसायात पैसे गुंतविले होते. सुरुवातीला त्याने परतावा दिला. त्यानंतर त्याने परतावा दिला नाही. त्यामुळे तक्रारदारांनी त्याच्याकडे पाठपुरावा केला.

हेही वाचा : पुणे: परदेशी चलन खरेदी व्यवहारात तरुणाची फसवणूक

अष्टेकरने त्याचे कार्यालय बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. प्राथमिक तपासात अष्टेकरने १२१ जणांची नऊ कोटी २ लाख ७३ हजार रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. गुन्ह्याची व्याप्ती विचारात घेऊन संबंधित गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी सोपविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ तपास करत आहेत.