पुणे : मुंबई-पुणे रस्त्यावर खडकी रेल्वे स्थानक परिसरात भरधाव एसटी बसने मोटारीला धडक दिल्याची घटना रविवारी घडली. अपघातात मोटारीतील भूमी अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू झाला. अपघातात महिलेचा पती आणि मोटारचालक भाऊ, तसेच दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात एसटी बसमधील १२ प्रवासी किरकोळ जखमी झाले. मनिषा विजयसिंह भोसले (वय ४०, रा. कवठे महंकाळा, जि. सांगली) असे मृत्युमुखी पडलेल्या अधिकारी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी एसटी बसचालक अनंत पंजाबराव उईके (वय ३३, रा.नारायणगाव) याला ताब्यात घेतले असून, खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनीषा भोसले आणि त्यांचे पती शासकीय अधिकारी आहेत. त्यांची नुकतीच पुरंदर तालु्क्यात बदली झाली होती. त्या पिंपरीतील चिखली भागात राहणाऱ्या भावााकडे आल्या होत्याा. भोसले यांनी हडपसर भागात भाडेतत्वावर घर भाड्याने घेतले आहे. रविवारी सकाळी मोटारीतून भोसले, त्यांचे पती आणि भाऊ हडपसरकडे निघाले होते. एसटी बस शिवाजीनगर स्थानकातून नारायणगावकडे निघाली होती. खडकी रेल्वे स्थानक परिसरात समोरून येणाऱ्या भरधाव एसटी बसने मोटारीला धडक दिली. अपघातात मोटारीच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले.अपघातनंतर एसटी बसचालकाचे नियंत्रण सुटले. एसटी बसने एका मोटारीला आणि दुचाकीस्वाराला धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला.

हेही वाचा : आदेश धुडकावून मोर्चा काढल्याप्रकरणी आझाद समाज पार्टीच्या ३०० कार्यकर्त्यांवर गुन्हा

अपघातानंतर रहिवासी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मोटारीत अडकलेल्या तिघांना बाहेर काढण्यात आले. त्यांना तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच भाेसले यांचा मृत्यू झाला. अपघातात भोसले यांचे पती आणि मोटारचालक भाऊ जखमी झाला असून, त्यांच्यावर ससूनमधील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातात एसटी बसमधील १२ प्रवाशांना दुखापत झाली. अपघातानंतर जु्न्या मुंबई-पुणे महामार्गावर कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.