पुणे : जालना येथील आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी केलेल्या मागण्या राज्य सरकारने तातडीने मान्य कराव्यात. यासह समाजाच्या इतर प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी (१४ सप्टेंबर) शहराच्या बाणेर, बालेवाडी, बोपोडी, औंध या भागांत बंद ठेवण्यात आला आहे. या परिसरातील काही शाळा, महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना सुट्टी दिली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. आगामी काळातील गणेशोत्सव लक्षात घेता व्यावसायिक नुकसान टाळण्यासाठी पुणे बंदऐवजी लाक्षणिक उपोषणाचा मार्ग स्वीकारण्यात आल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : दोन शाळा, एका महाविद्यालयाला संघाच्या बैठकीमुळे तीन दिवस सुटी

तसेच बाणेर, बालेवाडी, बोपोडी, औंध या भागांतील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांबरोबर संपर्क साधून त्याठिकाणचे सर्व व्यवहार सुरळीतपणे सुरू राहतील, याची काळजी घेतली जाईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, या भागात अघोषित बंद असल्याचे दिसून येत आहे. या परिसरातून हिंजवडीला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासादरम्यान कोणताही त्रास होऊ नये, यासाठी अनेक कंपन्यांनी त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याची सुविधा दिली. मराठा क्रांती मोर्चाकडून सकाळी दहा वाजता मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ लाक्षणिक उपोषण केले जाणार आहे. दरम्यान, शहराच्या मध्य भागासह इतर भागातील शाळा, महाविद्यालये नेहमीप्रमाणे सुरू आहेत. शहरात आजपासून हिंदी भाषा संमेलन, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय समितीची बैठक सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सकाळपासूनच प्रमुख चौकात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune maratha kranti morcha calls pune bandh for maratha reservation pune print news psg 17 css