पुणे : राज्यात गुइलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) रुग्णांची संख्या १११ वर पोहोचली असून, आतापर्यंत एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात सर्वाधिक १०३ रुग्ण पुण्यात असून, १३ जण व्हेंटिलेटरवर आहेत. रुग्णसंख्येत वाढ सुरूच असल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने बाधित भागात रुग्ण सर्वेक्षण करण्यावर भर दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राज्यातील एकूण रुग्णांपैकी ७७ पुरुष आणि ३४ महिला आहेत. सर्वाधिक रुग्ण पुणे परिसरात असून, त्यात पुणे महापालिका २०, पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेला भाग ६६, ग्रामीण ५, पिंपरी-चिंचवड महापालिका भागात १२, आणि इतर जिल्ह्यांतील ८ रुग्ण आहेत. राज्यातील एकूण रुग्णांपैकी ३१ रुग्णांचे जीबीएसचे निश्चित निदान झाले आहे, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

रुग्णांचे शौच, रक्त आणि लघवी नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात येत आहेत. एनआयव्हीकडे पाठविण्यात ७६ रक्त नमुन्यांमध्ये डेंग्यू, चिकुनगुन्या आणि झिका संसर्ग आढळून आलेला नाही. एनआयव्हीकडे ५७ रुग्णांचे शौचनमुने पाठविण्यात आले. त्यात १७ नमुन्यांमध्ये नोरोव्हायरस हा विषाणूसंसर्ग आणि ५ नमुन्यांमध्ये कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी हा जीवाणूसंसर्ग आढळला, असेही आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून बाधित भागांमध्ये तातडीने रुग्ण सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. ‘जीबीएस’ची लक्षणे दिसून येणाऱ्या रुग्णांचा शोध आरोग्य विभागाची पथके घेत आहेत. रुग्ण आढळून आलेल्या परिसरात आरोग्य विभागाकडून ४५ हजार ५२ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. महापालिका आणि आरोग्य विभागाने यासाठी ८६ पथके तैनात केली आहेत. याचबरोबर खासगी डॉक्टरांनी जीबीएसचे रुग्ण आढळल्यास तातडीने आरोग्य विभागाला कळविण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

जीबीएसची तपासणी

  • रुग्णांच्या ५७ शौच नमुन्यांची तपासणी
  • १७ शौच नमुन्यांत नोरोव्हायरस
  • ५ शौच नमुन्यांत कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी
  • रुग्णांच्या ७६ रक्त नमुन्यांची तपासणी
  • सर्व रक्त नमुन्यांमध्ये झिका, डेंग्यू, चिकुनगुन्या संसर्ग नाही

चार मेंदूविकार तज्ज्ञ महापालिकेच्या रुग्णालयात सेवा देणार

पुणे शहरात गुइलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) च्या रुग्णांसाठी महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचारांची सुविधा दिली जाणार आहे. या आजाराच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेकडे मेंदूविकार तज्ज्ञ (न्यूरोलॉजिस्ट) महापालिकेकडे नसल्याने उपचारात अडचणी येणार होत्या. मात्र, महापालिकेने केलेल्या आवाहनानंतर चार मेंदूविकार तज्ज्ञांनी महापालिकेच्या रुग्णालयात सेवा देण्याची तयारी दाखविली आहे. एका डॉक्टरांच्या सेवेला सुरुवातही झाली आहे. राजाराम पूल ते खडकवासलादरम्यान महापालिका हद्दीतील भागाला बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणी घरोघरी जाऊन महापालिकेकडून सर्वेक्षण केले जात आहे. ८५ पथके त्यासाठी नेमली आहेत. या आजारावर नियंत्रण मिळवण्यास यश मिळत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी दिली.

रुग्णांच्या मदतीसाठी नोडल अधिकारी

जीबीएसच्या रुग्णांची माहिती एकत्र करण्यासाठी तसेच रुग्णांना महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या योजनेचा फायदा घेताना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी शहरातील रुग्णालयांसाठी आरोग्य विभागाने नोडल अधिकाऱ्यांची नियुक्त केली आहे. एका अधिकाऱ्याकडे २ ते ३ रुग्णालयांची जबाबदारी दिली आहेत. रुग्णांची माहिती गोळा करणे, त्यांना कोणत्या योजनेत लाभ देता येईल, याची माहिती देणे या सेवा त्यांना द्याव्या लागणार आहेत. रुग्णांच्या शौच नमुने आणि पाणी नमुने यांची शंभर टक्के तपासणी केली जात आहे. तसेच, बाधित गावांमध्ये मेडीक्लोरच्या बाटल्यांचे वाटप महापालिकेकडून करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत ६०० बटल्यांचे वितरण केले आहे. साधारण ३० हजार घरांमध्ये हे वाटप केले जाणार आहे.

शहरी गरीब योजनेचा फायदा मिळणार

जीबीएसच्या रुग्णांवर महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. तसेच, या बाधित क्षेत्रातील रुग्णांना महापालिकेच्या शहरी गरीब योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठी शहरी गरीब योजनेचा निधी एक लाखावरून दोन लाख करण्यात आला आहे. जे नागरिक शहरी गरीब योजनेत पात्र होत नाही, त्यांनाही एक लाखांची मदत महापालिकेच्या वतीने उपचारांसाठी केली जाणार आहे. यासाठी महापालिकेकडे अर्ज सादर करावा लागणार आहे व हमीपत्र द्यावे लागणार आहे. या योजनेचा लाभ १३ जानेवारीनंतर दाखल झालेल्या रुग्णांना दिला जाणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Increase in the number of gbs patients continues in pune health department emphasis on survey pune print news stj 05 ssb