पुणे : रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीचे दायित्व असलेल्या रस्त्यांबाबतचा अहवाल देण्याची सूचना महापालिकेच्या पथ विभागाने क्षेत्रीय कार्यालयांना केली असली, तरी क्षेत्रीय कार्यालयांकडून ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू झाला आहे. वारंवार सूचना देऊनही एकाही क्षेत्रीय कार्यालयाने त्याबाबतची माहिती पथ विभागाला कळविलेली नाही.
महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयांकडून बारा मीटर रुंदीपर्यंतच्या रस्त्यांची कामे केली जातात. तर बारा मीटर रुंदीपेक्षा जास्त रुंदीचे रस्ते मुख्य पथ विभागाकडून केले जातात. यामध्ये रस्ते विकसन, देखभाल दुरुस्ती आदी कामांचा समावेश आहे. जुलै महिन्यातील जोरदार पावसाने शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाली. प्रमुख रस्त्यांसह बारा मीटर रुंदीच्या रस्त्यांवर लहान-मोठे शेकडो खड्डे पडल्याची वस्तुस्थिती समोर आली. यामध्ये देखभाल दुरुस्तीचे दायित्व असलेल्या रस्त्यांचाही समावेश होता. त्यामुळे देखभाल दुरुस्तीचे दायित्व असतानाही रस्त्यांवर खड्डे पडल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारांविरोधात दंडात्मक कारवाई महापालिका प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. दायित्व असलेल्या रस्त्यांवर खड्डे पडल्याप्रकरणी प्रति खड्डा पाच हजार रुपये ठेकेदाराकडून आकारण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी पथ विभागाकडून सुरू करण्यात आली आहे.
दंडात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालयांनीही त्यांच्याकडील देखभाल दुरुस्तीचे दायित्व असलेल्या रस्त्यांची यादी पाठवावी, अशी सूचना पथ विभागाने केली होती. अतिरिक्त आयुक्त कार्यालयाकडूनही तसे आदेश काढण्यात आले होते. मात्र या आदेशाला क्षेत्रीय कार्यालयाकडून केराची टोपली दाखविण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारांना पाठीशी घालण्यासाठी अहवाल देण्यासही टाळाटाळ केली जात आहे.
शहरातील पाच हजार खड्डे बुजविण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत अडीच कोटींचा खर्च केला आहे. देखभाल दुरुस्तीच्या कालावधी असतानाच रस्त्यांची चाळण झाल्याने महापालिकेला हा खर्च करावा लागला असल्याने रस्त्याचे दायित्व असलेल्या ठेकेदाराकडून प्रति खड्डा पाच हजार रुपये आकारण्याचा निर्णय पथ विभागाने घेतला आहे. मुख्य खात्यासह क्षेत्रीय कार्यालय स्तरावरही या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
रस्ते ठेकेदारांचे दायित्व
रस्त्याचे काम पाहणाऱ्या ठेकेदाराकडे देखभाल दुरुस्तीचे दायित्व असते. त्यासाठी कालमर्यादा निश्चित केली जाते. या कालमर्यादेत रस्त्यांची दुरवस्था झाली किंवा रस्त्यांवर खड्डे पडले तर त्याची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असते. मात्र महापालिकेने ठेकेदारांवर कारवाई न करता खड्डे बुजविण्यास सुरुवात केली होती. टीकेनंतर महापालिकेच्या पथ विभागाने दायित्व असलेल्या १२० रस्त्यांची यादी तयार केली आहे. या यादीनुसार रस्त्यांचे सर्वेक्षण करण्याचे काम त्रयस्थ संस्थेला देण्यात आले होते. या संस्थेकडून पहिल्या टप्प्यात देखभाल दुरुस्तीचे दायित्व असलेल्या ४५ रस्त्यांची पाहणी करण्यात आली. त्यापैकी ११ रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे आढळल्याने रस्त्याचे काम केलेल्या ठेकेदारांना नोटिस बजाविण्यात आल्या. आता त्यांच्याकडून प्रति खड्डा पाच हजार रुपये आकारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
