पुणे : इराण-इस्त्राइलमधील तणाव कायम असताना पुणे-सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर परिसरात इराणचा ध्वज आणि अयातुल्लाह खामेनी यांचे छायाचित्र असलेला फलक लावण्यात आल्याने खळबळ उडाली. पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर ध्वज आणि खामेनी यांचा फलक काढून टाकण्यात आला.

पुणे-सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर परिसरात इराणचा ध्वज आणि खामेनी यांचे छायाचित्र असलेले फलक लावण्यात आले होते. याबाबतची चित्रफीत समाजमाध्यमात प्रसारित झाली. त्यानंतर पोलिसांनी संबंधित फलक आणि ध्वज काढून टाकला. ध्वज आणि फलक लावणाऱ्यांचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

हे फलक लोणी काळभोर ग्रामपंचायतीची परवानगी न घेता लावण्यात आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीकडून संबंधितांना नोटीस बजाविण्यात आली आहे. पोलिसांकडून याप्रकरणाची चौकशी करण्यात आली. तेव्हा मुस्लीम बांधवांच्या मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर हे फलक एका वस्तीजवळ लावण्यात आले होते. याप्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे यांनी दिली.