गेल्या काही दशकांत माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांमध्ये वाढ होत आहे. या क्षेत्राची चमक ही तरुणांना भुरळ पाडण्यास कारणीभूत ठरत होती. आता या क्षेत्रातील मंदीचे वारे आणि कर्मचारी कपात हे मुद्दे सातत्याने चर्चेत आहेत. अनेक बड्या आयटी कंपन्यांकडून हजारो कर्मचाऱ्यांची कपात करण्याची घोषणा केली जात आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात होत असल्याने एकूण या क्षेत्रातच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून काही कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना अन्यायी वागणूक देण्याचे प्रमाणही वाढले आहे.
पुण्यातील सदाशिव पेठेतील एका आयटी कंपनीतही असाच प्रकार घडला आहे. या बहुराष्ट्रीय कंपनीत काम करणाऱ्या सहा महिला कर्मचाऱ्यांनी कंपनीतील विखारी वातावरणाला कंटाळून राजीनामा दिला. या कर्मचारी संगणक अभियंता म्हणून नोकरीस होत्या. उच्चशिक्षित असलेल्या या तरुणी सुमारे दोन ते पाच वर्षे कंपनीत काम करीत होते. त्यांना अपमानास्पद वागणुकीसोबत शिवीगाळही केली जात होती. कंपनीकडून सुरू असलेला छळ सहन करण्यापलीकडे गेल्याने अखेर मासिक लाखभर पगाराच्या नोकरीवर लाथ मारण्याचे धाडस त्यांनी दाखविले. मात्र, त्यानंतरही कंपनीने त्यांचा छळ सुरूच ठेवला.
कंपनीने सुरुवातीला या महिला कर्मचाऱ्यांना सेवेतून मुक्त करण्यास नकार दिला. कर्मचाऱ्यांनी तीन महिने नोटीस कालावधी पूर्ण करण्याची तयारी दर्शविली. कर्मचाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविलेला प्रकल्प पूर्ण करूनच बाहेर पडावे, अशी आठमुठी भूमिका कंपनीने घेतली. याचबरोबर कंपनी सोडल्याचे पत्रही कर्मचाऱ्यांना देण्यास नकार दिला.
तसेच, अनुभवाचे प्रमाणपत्र आणि कर्मचाऱ्यांचे उरलेले वेतनही देणार नाही, असे कंपनीच्या व्यवस्थापनाने सांगितले. या कर्मचाऱ्यांनी वारंवार विनंती करून व्यवस्थापनाने ऐकले नाही. उलट त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. एखादी कंपनी कर्मचाऱ्यांना कशी हीन वागणूक देते, याचेच हे उदाहरण आहे.
या महिला कर्मचाऱ्यांनी पोलीस, कामगार आयुक्त कार्यालयापासून राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. कामगार आयुक्त कार्यालयाने त्यांच्या तक्रारीची दखल घेतली. यावर सुनावणीही झाली मात्र, अद्याप निर्णय झालेला नाही. उलट या सुनावणीनंतर कंपनीच्या व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना आणखी धमकावण्यास सुरुवात केली.
आता न्यायासाठी या महिला कर्मचारी शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहेत. मात्र, त्यांच्या हाती अजूनही काही ठोस लागलेले नाही. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची परवड या निमित्ताने समोर आली आहे.
माफीनाम्यासाठी आग्रह
या कंपनीतील एका पीडित कर्मचाऱ्याने तिचा अनुभव मांडला. तिने सांगितले की, कंपनीने आमच्याकडून माफीनाम्याचा आग्रह धरला आहे. आमची काहीही चूक नसताना व्यवस्थापन माफीनामा मागत आहे. अनेक वेळा आम्हाला कार्यालयीन बैठकांमध्ये अपमानास्पद वागूणक देण्यात आली.
कंपनीतील त्रासातून कंटाळून आधी काही महिला कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिला होता. तरीही व्यवस्थापनाने त्यांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे पत्र दिले होते. भविष्यात इतर महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत असा प्रकार घडू नये, यासाठी आम्ही आता दाद मागत आहोत.
sanjay.jadhav@exprerssindia.com