पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी सुशील याने बनावट कागदपत्रे सादर करून पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाना मिळवल्याचे उघड झाले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणात सुशील याचा तााबा कोथरूड पोलिसांनी सोमवारी घेतला.

वैष्णवीचा पती शशांक आणि दीर सुशील हे मुळशी तालुक्यातील भुकूम येथे वास्तव्यास आहेत. २०२२ मध्ये त्यांनी पुणे पोलिसांकडे शस्त्र परवाना मिळविण्यासाठी अर्ज केला हाेता. याप्रकरणात त्यांनी वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात सदनिकेचा भाडेकरार वास्तव्याचा पुरावा म्हणून पोलिसांकडे सादर केला होता.

शशांक, सुशील आणि हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय नीलेश चव्हाण यांनी एकाच वर्षी शस्त्र परवाने मिळवले होते. या प्रकरणाच्या तपासात दोघांनी शस्त्र परवान्यासाठी बनावट पत्ते दिल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांच्याविरुद्ध कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले.

हगवणे आणि चव्हाण हे सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणात सुशील याला सोमवारी कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले. शशांक आणि नीलेश चव्हाण यांना मंगळवारी (१० जून) ताब्यात घेतले जाणार आहे, अशी माहिती परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी दिली.