पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) अभियांत्रिकी, तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई – मेन्स) या परीक्षेतील पेपर एकचा निकाल जाहीर केला. त्यानुसार देशभरातील २३ विद्यार्थ्यांना शंभर पर्सेंटाइल मिळाले असून, राज्यातील आर्यन प्रकाळ, नीलकृष्ण गाजरे, दक्षेश मिश्रा या तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनटीएने जानेवारी सत्रातील जेईई मुख्य परीक्षा २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत एकूण ५४४ परीक्षा केंद्रांवर संगणकीय पद्धतीने घेण्यात आली. या परीक्षेसाठी १२ लाख २१ हजार ६२४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यात ११ लाख ७० हजार ४८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. मराठीसह एकूण १३ भाषांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली.

हेही वाचा – पिंपरी पोलिसातील हवालदाराचे होत आहे कौतुक, शरीर सौष्ठव स्पर्धेत मिळवले सुवर्ण पदक

जेईई मुख्य परीक्षा दोन सत्रांमध्ये घेतली जाते. जानेवारीमध्ये झालेल्या पहिल्या सत्रानंतर आता दुसऱ्या सत्राची परीक्षा ४ ते १५ एप्रिल या कालावधीत होणार आहे. या दोन्ही परीक्षांच्या निकालानंतर सर्वोत्कृष्ट निकालाच्या आधारे क्रमवारी तयार करण्यात येणार आहे. वास्तुकला आणि नियोजन या अभ्यासक्रमांसाठीच्या जेईई मुख्य परीक्षा पेपर २चा निकालही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती एनटीएने दिली.

हेही वाचा – पुणे : कर्नाटकातील चडचंण टोळीच्या म्होरक्यासह साथीदारांना पकडले; तीन पिस्तुल, २५ काडतुसे जप्त

परीक्षेदरम्यान गैरप्रकार टाळण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली होती. तसेच परीक्षा केंद्रांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर असलेल्या चित्रफित विश्लेषण आणि आभासी निरीक्षक पद्धतीचाही वापर करण्यात आला. तसेच मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर अद्ययावत ‘फाईव्ह जी जॅमर’ही लावण्यात आले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jee mains result announced how many students in the state got 100 percentile pune print news ccp 14 ssb