पारितोषिक विजेत्यांची भावना
मित्राला पारितोषिक मिळाले, आपणही लिहूया, विषय आवडला म्हणून.. यापासून मैत्रिणीला पत्र लिहिण्याचा सराव म्हणून अशा विविध कारणांसाठी विद्यार्थी लिहिते झाले आणि हळूहळू सामाजिक विषयांवरही व्यक्त होऊ लागले. महाविद्यालयात ‘बॅक बेंचर्स’ असलेल्या काहींना आता ‘ब्लॉग बेंचर्स’ म्हणून ओळख मिळाली आहे. लिहित्या विद्यार्थ्यांना व्यक्त होण्यासाठी संधी देणाऱ्या, शिस्तबद्ध लिखाणाची सवय लावणाऱ्या ‘लोकसत्ता ब्लॉग बेंचर्स’मधील पुण्यातील विजेत्यांना नुकतीच पारितोषिके देण्यात आली.
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालये, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा व्यवस्थापनशास्त्र विभाग यातील विद्यार्थी लोकसत्ता ब्लॉग बेंचर्समुळे लिहिते झाले आहेत. पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांकडून प्रोत्साहन घेऊन त्यांचे मित्रही लिहिते झाले आहेत. ‘अभ्यासक्रमाबाहेरील विषयांचे वाचन करणे, स्वत:ला जे हवे ते शिस्तबद्ध पद्धतीने मांडता येणे याची सवय या स्पर्धेमुळे लागली. अगदी कॅम्पस मुलाखतींपासून, स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठीही उपयोग होत असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
मित्रांकडून स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन अभ्यासक्रम विभागातील संदेश ननवरे याने ‘स्वच्छ भारत’ या अग्रलेखावर लिहिलेल्या प्रतिक्रियेला प्रथम पारितोषिक मिळाले. ‘लिहायला आवडत होतेच. ब्लॉग बेंचर्स हे लिहिण्यासाठी चांगले व्यासपीठ वाटले. त्यामुळे या स्पर्धेत सहभागी झालो. यापुढेही लिहिणार आहे,’ असे संदेश याने सांगितले. त्यानंतर विभागातील इतरही विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले. ‘अजूनही येतो वास फुलांना..’ या अग्रलेखावर विभागातील रोहन सपकाळ याला प्रथम क्रमांक तर प्रशांत हाके याला द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ‘घडणाऱ्या अनेक गोष्टी पटत नाहीत. त्यासाठी समाजमाध्यमांवर व्यक्त होता येते. मात्र अशा व्यक्त होण्याला शिस्त नसते. टीका स्वीकारण्याची वृत्ती, संयम समाजमाध्यमांवर दिसून येत नाही. त्यामुळे ‘ब्लॉग बेंचर्स’ मध्ये सहभागी झालो,’ असे रोहन म्हणाला. विषय आवडला, म्हणणे मांडावेसे वाटले म्हणून या स्पर्धेत सहभागी झाल्याचे प्रशांत याने सांगितले. भविष्यात शाश्वत विकासासाठी ‘थिंक टँक’ तयार करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या सुजीत धारराव याला ‘जागते रहो..’ या अग्रलेखावरील प्रतिक्रियेसाठी द्वितीय क्रमांक मिळाला आहे. ‘समाजमाध्यमांवर व्यक्त व्हायला आवडते. वाचून विचार करण्याची आणि तो शिस्तबद्धपणे मांडण्याची सवय लागली,’ असे सुजीत याने सांगितले.
स्पर्धेच्या निमित्ताने लिखाणाला सुरुवात..
अभियांत्रिकी विद्याशाखेचे शिक्षण घेत असताना या स्पर्धेने अनेकांना लिखाणाची संधी मिळवून दिली आहे, तर काही जणांनी नव्याने लेखन करण्यास सुरुवात केली आहे. सोलापूरवरून येऊन लोणावळा येथील सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील निखिल शिंदे याला ‘बळीराजा आणि बाजारपेठ’ या अग्रलेखावरील प्रतिक्रियेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ‘घरातील शेती जवळून पाहताना त्यावर लिहिण्याची, जे पाहतो, वाटते ते मांडण्याची संधी या स्पर्धेने दिली,’ असे निखिल याने सांगितले. मूळचा नांदेडचा, मुंबईतील सरदार पटेल महाविद्यालयातून पदवी घेऊन सध्या पुण्यात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सत्यजित घोडके याला ‘शिक्षणाची त्रेधातिरपीट..’ या अग्रलेखावरील प्रतिक्रियेसाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. ‘शिक्षण या विषयावर लिहायला, अभ्यास करायला आवडते. म्हणून या स्पर्धेच्या निमित्ताने लेखनास सुरुवात केली,’ असे सत्यजित याने सांगितले. अवसारीच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अजित साळुंखे याला ‘गहिरी हवा..’ या अग्रलेखावरील प्रतिक्रियेसाठी द्वितीय क्रमांक मिळाला. ‘पूर्वी लिहिलेले स्वत:पुरतेच ठेवत होतो. कुणाला वाचायला द्यायला आवडायचे नाही. मात्र आता लिहित राहीन,’ असे अजित याने सांगितले. ‘माननीय मेनन’ या अग्रलेखावरील प्रतिक्रियेसाठी सागर राठोड याला द्वितीय क्रमांक मिळाला. ‘चांगल्या मार्गाने जा असे अनेकजण सांगतात. पण चांगले वाचा, लिहा म्हणजे काय हे ‘लोकसत्ता’मुळे शिकलो,’ असे सागर याने सांगितले. गरवारे महाविद्यालयातील हर्षवर्धन राजेमाने याला ‘छातीचे माप..’ या अग्रलेखावरील प्रतिक्रियेसाठी पारितोषिक मिळाले. ‘लिखाण करायला आवडायला लागले आहे. स्पर्धेत पारितोषिक मिळाल्यानंतर आता महाविद्यालयातही ओळखू लागले आहेत,’ असे हर्षवर्धन याने सांगितले.