पुणे : ‘लिंक्ड-इन’ने पुण्यातील आघाडीच्या १० नवउद्यमी (स्टार्टअप) कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. त्यात रोबोटिक्स, वाहन तंत्रज्ञान आणि डिजिटल क्षेत्रातील नवउद्यमी कंपन्यांनी स्थान पटकाविले आहे. पहिल्या स्थानी ईमोटोरॅड, तर दुसऱ्या स्थानी झेप्टो या नवउद्यमी कंपन्या आहेत. देशातील आघाडीच्या नवउद्यमी कंपन्यांच्या यादीतही या दोन कंपन्यांनी स्थान मिळविले आहे.

व्यावसायिक नेटवर्क असलेल्या ‘लिंक्ड-इन’ने वर्षभरातील पुण्यातील आघाडीच्या १० नवउद्यमी कंपन्यांची यादी जाहीर केली आहे. यात या कंपन्यांमध्ये मनुष्यबळात झालेली वाढ, त्यांच्याबद्दल ‘लिंक्ड-इन’ वापरकर्त्यांना वाटणारा जास्तीत जास्त रस, रोजगारासाठी प्राधान्य, वरिष्ठ पातळीवरील गुणवत्ता आकर्षित होणारे या घटकांचा विचार करण्यात आला. या यादीत इलेक्ट्रिक वाहननिर्मिती क्षेत्रातील ‘ईमोटोरॅड’ कंपनीने बाजी मारली आहे. त्यानंतर क्विक कॉमर्स क्षेत्रातील ‘झेप्टो’ कंपनी दुसऱ्या स्थानी आहे. तिसऱ्या स्थानी सॅसआधारित कर्ज वितरण मंच ‘लेंट्रा’ आहे. या तिन्ही नवउद्यमी कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील असून, त्यांची वेगाने वाढ होत आहे.

रोबोटिक्स क्षेत्रातील ‘पेपरमिंट रोबोटिक्स’ आणि ‘अनबॉक्स रोबोटिक्स’ या दोन नवउद्यमी कंपन्या अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी आहेत. या दोन कंपन्यांनी औद्योगिक ऑटोमेशन आणि पुरवठा साखळीतील कार्यक्षमता यासाठी नवतंत्रज्ञान आणले आहे. या यादीत बहुभाषिक तंत्रज्ञान विकसित करणारी ‘रिकायन टेक्नॉलॉजी’ सहाव्या स्थानी, ऑडिओ सीरीज मंच ‘पॉकेट एफएम’ सातव्या स्थानी, इलेक्ट्रिक दुचाकी क्षेत्रातील ‘मॅटर’ आठव्या स्थानी, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान विकसित करणारी ‘इमर्सिव्ह व्हिजन टेक्नॉलॉजी’ नवव्या स्थानी आणि शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणारी ‘किसानकनेक्ट सेफ फूड्स’ दहाव्या स्थानी आहे.

निवडीचे निकष

पुण्यातील आघाडीचे नवउद्यमी निवडताना चार प्रमुख निकष लावण्यात आले. यात नवउद्यमी कंपनीतील मनुष्यबळात होणारी वाढ, तिच्याबद्दल वापरकर्त्यांना वाटत असलेली उत्सुकता, तिथे नोकरीसाठी मिळणारे प्राधान्य आणि वरिष्ठ पातळीवरील गुणवत्ता आकर्षित होणे या निकषांचा समावेश आहे. ‘लिंक्ड-इन’वर असलेल्या कंपनीच्या पेजवर तिच्या कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त इतरांनी व्यक्त केलेली मतेही विचारात घेण्यात आली आहेत. त्याचबरोबर कंपनीच्या पेजला बाहेरील किती व्यक्तींना भेट दिली ही बाबही ग्राह्य धरण्यात आली आहे. ‘लिंक्ड-इन’च्या जगातील आघाडीच्या कंपन्यांच्या यादीतील कंपन्यांमधील किती कर्मचारी या नवउद्यमी कंपन्यांत रुजू झाले, हेही तपासण्यात आले आहे. १ जुलै २०२४ ते ३० जून २०२५ या काळातील विश्लेषणाच्या आधारे पुण्यातील आघाडीच्या नवउद्यमींची यादी जाहीर करण्यात आली आहे.

पुण्यातील आघाडीचे १० नवउद्यमी

१) ईमोटोरॅड

२) झेप्टो

३) लेंट्रा

४) पेपरमिंट रोबोटिक्स

५) अनबॉक्स रोबोटिक्स

६) रिकायन टेक्नॉलॉजी

७) पॉकेट एफएम

८) मॅटर

९) इमर्सिव्ह व्हीजन टेक्नॉलॉजी

१०) किसानकनेक्ट सेफ फूड्स