पुणे : कृत्रिम प्रज्ञेचा (एआय) वापर आता विविध क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात होत आहे. कृत्रिम प्रज्ञेच्या माध्यमातून पुनरावृत्तीची कामे प्रामुख्याने पार पडत आहेत. याचाच परिणाम होऊन कर्मचाऱ्यांची वाटचाल अधिक मनुष्यकेंद्रित व्यावसायिक जबाबदाऱ्यांकडे होऊ लागली आहे. ‘लिंक्डइन’ या व्यावसायिक नेटवर्कने केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे.
‘लिंक्डइन’ने देशभरात १ हजार ९०६ व्यावसायिकांचे सर्वेक्षण करून अहवाल जाहीर केला. या अहवालानुसार, अनेक क्षेत्रांमध्ये पुनरावृत्तीच्या स्वरूपाची कामे मोठ्या प्रमाणात असतात. ही कामे आता ‘एआय’च्या मदतीने कमी वेळेत होत आहेत. कर्मचाऱ्यांवर प्रामुख्याने मानवी निर्णयक्षमता, सर्जनशीलता आणि थेट संवाद आवश्यक असलेल्या जबाबदाऱ्या वाढत आहेत. उदाहरण द्यायचे झाल्यास, मनुष्यबळ क्षेत्रातील कर्मचारी ग्राहक प्रतिसाद आणि प्रशासकीय भूमिकांकडे वळत आहेत. त्याच वेळी वित्तीय क्षेत्रातील कर्मचारी ग्राहक प्रतिसाद आणि लेखा (अकाउंटिंग) जबाबदाऱ्या निवडत आहेत. तसेच, अभियंते शिक्षण क्षेत्रातील नोकऱ्यांकडे वळत आहेत.
व्यवसायविकास, बांधकाम आणि उत्पादन व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रात मानवी निर्णय क्षमता महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे या क्षेत्रातील महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांकडेही कल वाढत आहे. मानवी बौद्धिक आणि व्यावसायिक कौशल्यांना वाव असलेल्या क्षेत्रात नोकरीच्या संधी वाढत आहेत. कृत्रिम प्रज्ञेचा वापर केवळ मजकूर तयार करून तो आहे तसा वापरण्याएवढा मर्यादित नाही. त्याचा वापर नोकरीचा अर्ज, संशोधन, मुलाखत या सर्व बाबींसाठी व्हायला हवा. मानवी निर्णयक्षमता आणि कृत्रिम प्रज्ञा यांचा समतोल साधून प्रगती करता येते, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
‘एआय’वर विश्वास
कृत्रिम प्रज्ञेबाबत व्यावसायिकांमध्ये कमालीचा आत्मविश्वास दिसून येत आहे. कृत्रिम प्रज्ञेमुळे उत्पादकता वाढून कामाचा वेळ कमी झाल्याचा दावा ६२ टक्के जणांनी केला आहे. कृत्रिम प्रज्ञेमुळे भविष्यात आणखी संधी निर्माण होतील, असा विश्वास ५९ टक्के जणांनी व्यक्त केला आहे. माध्यमे, मनुष्यबळ, अभियांत्रिकी आणि विपणन या क्षेत्रांत कृत्रिम प्रज्ञेचा वापर वाढल्याने कर्मचारी उच्च मूल्याच्या आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांवर लक्ष केंद्रित करू शकत आहेत, असे लिंक्डइनच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
कृत्रिम प्रज्ञेमुळे कर्मचाऱ्यांच्या कारकिर्दीला पाठबळ आणि गती मिळणार आहे. कौशल्यविकास, क्षमता सिद्ध करणे आणि कृत्रिम प्रज्ञा साधनांचा वापर या तीन गोष्टींवर भर देणारे व्यावसायिक स्पर्धेत पुढे जात आहेत. कौशल्याधारित संधी शोधून ती मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तुम्ही तुमचे काम लिंक्डइनसारख्या मंचावर आठवड्यातून अथवा दोन आठवड्यांतून एकदा मांडल्यास ते अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचते. यातून नवीन व्यावसायिक संधी निर्माण होतात. – निराजिता बॅनर्जी, वरिष्ठ व्यवस्थापकीय संपादक, लिंक्डइन इंडिया न्यूज