पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेशासाठीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद कमी असल्याचे चित्र आहे. प्रवेशासाठी उपलब्ध एक लाख १९ हजार २९० जागांसाठी ९२ हजार ७९७ विद्यार्थ्यांनीच नोंदणी केली आहे.

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे अकरावी प्रवेशांची ऑनलाइन प्रक्रिया राबवण्यात येते. प्रवेशप्रक्रियेत प्रवेश अर्जाचा भाग एक आणि भाग दोन भरण्यासाठी विद्यार्थ्यांना १५ जूनपर्यंतची मुदत देण्यात आली होती. त्यानुसार केंद्रीय प्रवेश (कॅप) आणि कोटा प्रवेश मिळून एकूण ७८ हजार ५२० विद्यार्थ्यांनी दोन्ही अर्ज भरले आहेत. त्यामुळे पहिल्या प्रवेश परीक्षेत दोन्ही अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांनाच संधी मिळणार आहे. प्रवेशासाठी उपलब्ध जागा आणि नोंदणी केलेले विद्यार्थ्यांचे प्रमाण पाहता अकरावीच्या प्रवेशासाठी फारशी अडचण येणार नसल्याचे दिसून येत आहे. ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेच्या नियमानुसार नोंदवलेल्या पसंतीक्रमातील पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश जाहीर झाल्यास तिथे प्रवेश घेणे अनिवार्य आहे. प्रवेश न घेतल्यास पुढील फेरीत सहभागी होता येणार नाही.

हेही वाचा – एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर, यंदा किती विद्यार्थी १०० पर्सेंटाइलचे मानकरी?

हेही वाचा – पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कोट्यवधींचा गुटखा कुठे केला जप्त?

प्रवेश प्रक्रियेत पूर्ण अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांची प्राथमिक गुणवत्ता यादी मंगळवारी (१८ जून) प्रसिद्ध केली जाणार आहे. अकरावी प्रवेशाच्या संकेतस्थळावर तक्रार निवारण प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना १८ ते २१ जून दरम्यान या यादीबाबत आक्षेप नोंदवता येईल. त्यानंतर २७ जूनला प्रवेशाची गुणवत्ता प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश निश्चित करून २७ जून ते १ जुलै दरम्यान महाविद्यालयात प्रत्यक्ष प्रवेश घेता येणार आहे.