पुणे : आपल्या आयुष्यभराच्या कमाईतील मोठा भाग आपली कारकीर्द घडलेल्या संस्थेला देण्याची घटना खरोखरच दुर्मीळ आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थिनी, सेवानिवृत्त शिक्षिका आणि संस्थेच्या आजीव सदस्य मंडळाच्या माजी सदस्या माणिक फुलंब्रीकर यांनी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून आपल्या भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा झालेला तब्बल एक कोटी रुपयांचा निधी संस्थेकडे सुपूर्द करून दातृत्वाचा आदर्श प्रस्थापित केला.
आबासाहेब गरवारे महाविद्यालयामध्ये गुरुवारी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात फुलंब्रीकर यांनी हा निधी मएसोच्या नियामक मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्याकडे सुपूर्द केला. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी आणि खासदार मेधा कुलकर्णी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. विलास फुलंब्रीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास उगले, मएसोचे सचिव डॉ. अतुल कुलकर्णी, सहाय्यक सचिव सुधीर भोसले या वेळी उपस्थित होते.कुलकर्णी म्हणाल्या, ‘कृतज्ञतेसारखा दुसरा कोणता अलंकार नाही. कृतज्ञता माणसाला सर्वात सुंदर बनवते असे ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांनी म्हटले आहे. फुलंब्रीकर मॅडम माझ्या शिक्षिका आहेत. त्यांनी दिलेल्या निधीचा आकडा ऐकून कोणीही
आश्चर्यचकित होईल. एका निवृत शिक्षिकेला इतका निधी देण्याची इच्छा का झाली असेल, त्यांच्या मनाची श्रीमंती किती असेल आणि त्यांच्या मनातील कृतज्ञतेचा भाव किती उच्च स्तराचा असेल असे विचार मनात येतात. फुलंब्रीकर या आमच्या प्रेरणास्थान आहेत आणि राहतील. मी देखील माझ्या खासदार निधीतून महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीसाठी आवश्यक निधी देईन.’
शिंदे म्हणाले, ‘एखाद्या धनाढ्य व्यक्तीने करोडो रुपयांची देणगी देणे ही खूप मोठी गोष्ट असली तरी ते अशक्य नसते. परंतु एका मध्यमवर्गीय व्यक्तीने, निवृत्त शिक्षिकेने आपल्या स्वकमाईचा इतका मोठा भाग देणगी म्हणून देण्याचा हा प्रसंग दुर्मीळ आहे. अशाच शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या आधारे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा वटवृक्ष उभा आहे. फुलंब्रीकर यांचा संस्थेशी प्रदीर्घ ऋणानुबंध आहे, त्यांनी घालून दिलेले उदाहरण कायमस्वरुपी लोकांच्या चर्चेत राहील आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेकजण त्यांचे अनुकरणदेखील करतील. त्यांच्या इच्छेनुसार या निधीतून महाविद्यालयातील प्रयोगशाळांचे नूतनीकरण करण्यात येणार येईल. फुलंब्रीकर यांची कोणतीही अपेक्षा नसली तरी महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्राच्या प्रयोगशाळेला त्यांचे नाव देण्यात येईल.’
एक विद्यार्थिनी आणि शिक्षिका म्हणून १९७३ ते २०१५ असा प्रदीर्घ काळ संस्थेशी माझा संबंध आला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात माझे व्यक्तिमत्त्व फुलले. संस्थेने मला ओळख दिली. त्यामुळे संस्थेबद्दल वाटणारे प्रेम मनाच्या तळातून आलेले आहे. आज मी देत असलेल्या निधीपेक्षा संस्थेने मला किती तरी पटीने अधिक दिले आहे.माणिक फुलंब्रीकर, सेवानिवृत्त शिक्षिका