पुणे – महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षेचे संचालक, नौरोसजी वाडिया महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शेखर घाटे (वय ७१) यांचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी राज्यातील आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा (एमटीएस) नौरोसजी वाडिया महाविद्यालयातर्फे १९९४मध्ये डॉ. जी. सी. कुलकर्णी यांच्यासह डॉ. घाटे यांनी सुरू केली. आजही ही परीक्षा आयोजित केली जाते. तसेच इतर व्यावसायिक स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी ग्रॅज्युएट एक्सलन्स एक्झाम (जीईई) ही परीक्षा डॉ. घाटे यांनी सुरू केली. तसेच विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, शिक्षकांनी विद्यार्थ्यांकडून स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करून घ्यावी या साठी डॉ. घाटे यांनी राज्यभर मार्गदर्शन केले.
निसर्गसेवक या संस्थेचे ते सक्रिय कार्यकर्ते होते. निसर्गसेवक या त्रैमासिकाची गेली दहा वर्षे धुरा सांभाळत होते. ‘लोकसत्ता’मध्ये गणितविषयक सदराचे लेखनही त्यांनी केले होते. विद्यार्थीप्रिय प्राध्यापक म्हणून त्यांची ओळख होती.