परळीचा वीज प्रकल्प बंद आहे, त्याचप्रमाणे गॅसबाबत विविध समस्या असल्याने वीजनिर्मिती कमी झाली असली, तरी नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यात पुरेशी वीज असल्याने वीज टंचाई भासणार नाही, असे स्पष्टीकरण राज्याचे उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री अजित पवार यांनी रविवारी केले.
पुण्यात विविध प्रकल्पांच्या उद्घाटनानिमित्त पवार यांनी उपस्थिती लावली. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. सध्या परळीचा वीजनिर्मिती प्रकल्प बंद आहे. त्याचप्रमाणे पुरेसा गॅस उपलब्ध नसल्याने दाभोळ व इतर वीजनिर्मिती प्रकल्पांतील वीजनिर्मितीही कमी झाली आहे. या पाश्र्वभूमीवर राज्यात पाणी टंचाईबरोबर विजेची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याबाबत पवार म्हणाले की, शासन व खासगी कंपन्यांच्या सहकार्याने राज्यात नवे प्रकल्प उभे केले आहेत. त्याचप्रमाणे बाहेरून वीज घेऊन राज्याच्या विजेची गरज भागविली जात आहे. त्यामुळे राज्यात विजेची टंचाई भासणार नाही.
भारनियमनाबाबत ते म्हणाले, विजेची बिले भरणाऱ्यांना २४ तास वीज देण्याची हमी मी देतो. पुरेशा प्रमाणात विजेच्या बिलांची वसुली होत नसलेल्या भागातच सध्या भारनियमन केले जात आहे. त्यामुळे या गोष्टीचे कुणी राजकारण करू नये. भारनियमन असलेल्या भागात ५० टक्क्य़ांपेक्षा कमी बिलांची वसुली होते. बिलांची वसुली किमान ७० टक्के झाली, तरी तेथे पुरेशी वीज दिली जाईल. आर्थिक शिस्त लावण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे.
पाण्याच्या समस्येबाबत ते म्हणाले, राज्यातील अनेक भागांत पाण्याची मोठी टंचाई आहे. काही ठिकाणी रेल्वेने पाणी पोहोचवावे लागते, अशी स्थिती सध्या निर्माण झाली आहे. त्यामुळे प्रत्येकाने पाणी काटकसरीने वापरले पाहिजे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra will not have electricity scarcity says ajit pawar
First published on: 12-02-2013 at 05:05 IST