पुणे : नोकरीच्या आमिषाने पुण्यातील तीन महिलांना आखाती देशात नेऊन त्यांचा छळ केल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने मुंबईतील माहिममधून मुख्य आरोपीला अटक केली. याबाबत मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. मोहम्मद अहमद याहया (२८, रा. ओशिवरा, मूळ रा. कर्नाटक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे, तर त्याच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत दोन महिलांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पडळकरांचे वादग्रस्त विधान, माफी मागितली चंद्रशेखर बावनकुळेंनी!

तक्रारदार महिला मार्केटयार्ड भागातील आंबेडकर वसाहतीत राहायला आहे. चंदननगर भागातील एका महिलेने आखाती देशात सफाई कामाची नोकरी आहे. दरमहा ३५ ते ४० हजार रुपये वेतन मिळेल, असे महिलांना सांगितले होते. तक्रारदार महिलांनी मुंबईतील दलालाशी संपर्क साधला. त्याने सौदी अरेबियातील रियाध शहरातील एका अरबी व्यक्तीकडे त्यांना साफसफाईचे काम मिळवून दिले होते. मात्र, अरबी व्यक्तीने त्यांचा छळ सुरू केला. विरोध केल्यास त्यांना मारहाण केली जात होती. दलालांनी महिलांची सौदी अरेबियातील व्यक्तीला चार लाख रुपयांत विक्री केली होती. याबाबत दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपी हा मुंबईत असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक राजेश माळेगावे, अंमलदार तुषार भिवकर, अमित जमदाडे यांचे पथक मुंबईला रवाना झाले. तांत्रिक तपासावरून पोलिसांनी आरोपी यहाला याला ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक राजेश माळेगावे, अंमलदार राजेंद्र कुमावत, तुषार भिवरकर, अमित जमदाडे, मनीषा पुकाळे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Main agent arrested from mahim in sale of women in pune to gulf country pune print news vvk 10 zws