पाऊस, वादळवारे आपल्या नियंत्रणाबाहेर असले, तरी त्यावर आपण सातत्याने चर्चा करतो. मात्र, परिसराभोवती नष्ट होणारी झाडे आणि नैसर्गिक नदीनाल्यांचे वाढते प्रदूषण याविषयी अनास्था दाखवतो. ही वृत्ती भावी काळात विनाशकारी ठरू शकते, असे मत लोकसत्ताचे सहसंपादक अभिजित घोरपडे यांनी निगडीत बोलताना व्यक्त केले.
स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या पर्यावरणविषयक व्याख्यानमालेत ‘माळीण तसेच उत्तराखंड दुर्घटना – नैसर्गिक की मानवनिर्मित’ या विषयावर ते बोलत होते. या दुर्घटनांमधील साम्य, तफावत व महत्त्वपूर्ण कारणांचा ऊहापोह करताना नद्यांचे बदललेले प्रवाह, मोठय़ा प्रमाणात वाहून जाणारी माती, त्यातून उद्भवणारे धोके आदी विविध मुद्दय़ांचा त्यांनी परामर्श घेतला.
घोरपडे म्हणाले, माळीण किंवा उत्तराखंड यांसारख्या दुर्घटना घडण्यामागे प्रत्यक्ष मानवी हस्तक्षेप नाही. मात्र, त्याची वारंवारता व तीव्रता वाढण्यामागे निश्चितपणे मानवी हस्तक्षेप आहे. लोकसंख्येची बेसुमार वाढ, मोठय़ा प्रमाणात होणारी जंगलतोड, त्यामुळे होणारी मातीची धूप, यामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवरचा वाढलेला ताण अशा घटना घडण्यास कारणीभूत ठरतात. पाश्चात्त्यांचे अनुकरण करताना त्यांचे निसर्गनियम व शिस्त आपण स्वीकारत नाही. आपल्याकडील दिवसेंदिवस वेगाने नष्ट होणारी जैवविविधता ही अंतर्मुख होऊन विचार करण्याची गोष्ट आहे. त्या दृष्टीने आपली जबाबदारी आपण टाळू शकत नाही. या वेळी मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांच्या हस्ते ‘मैत्री’ संस्थेला १५ हजारांची मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे संयोजन प्रदीप पाटील, सुनील पाटील, नीता जाधव, निनाद थत्ते यांनी केले. भास्कर रिकामे यांनी सूत्रसंचालन केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Malin abhijit ghorpade nature pollution