आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड वापरण्यावर बंदी असल्यामुळे आंबेविक्रेत्यांनी त्याच्या वापरासाठी नवीन क्लृप्त्या शोधून काढल्या आहेत. आंबे विक्रीच्या गाळ्यांमध्ये कॅल्शियम कार्बाइड सापडूच नये याची खबरदारी आता विक्रेते घेऊ लागले आहेत. छुप्या पद्धतीने कॅल्शियम कार्बाइड वापरून पिकवलेला तयार आंबाच कसा बाजारात आणता येईल याकडे विक्रेत्यांचे लक्ष असल्याचे अन्न व औषध प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून निदर्शनास येत आहे.
कॅल्शियम कार्बाइड वापरून आंबे पिकवणे थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष मोहीम सुरू केली आहे. गेल्या वर्षीही या प्रकारची मोहीम विभागाने राबवली होती. आतापर्यंत आंबाविक्रीच्या गाळ्यांमध्ये किंवा विक्री गोदामांमध्ये कॅल्शियम कार्बाइडची पांढरी पावडर सापडत असे. या पावडरच्या तपासणीवरून आंबा कॅल्शियम कार्बाइडने पिकवला गेल्याचे लगेच उघड होत असे. या वर्षी सुरू केलेल्या मोहिमेत विक्री गाळ्यांमध्ये कॅल्शियम कार्बाइड सापडू नये याची खबरदारी घेऊन झटपट पिकवलेला तयार आंबाच विक्रीला कसा आणता येईल, याकडे विक्रेत्यांचा कल असल्याचे एफडीएच्या निदर्शनास येत आहे.
अन्न विभागाचे सह आयुक्त शशिकांत केकरे म्हणाले, ‘‘आंबे विक्रेते उपनगर भागात लवकर आंबे पिकवण्यासाठी गोदामे भाडय़ाने घेत असल्याची माहिती मिळाली आहे. या गोदामांमध्ये कॅल्शियम कार्बाइड वापरून आंब्यांची अढी घालून आंबे पिकवले जातात. अढी पिकली की ८ ते १५ दिवसांत लगेच ती जागा सोडून माल दुसरीकडे हलवला जातो. असा पिकवलेला आंबा आकर्षक खोक्यांमध्ये बाजारात विक्रीस आणला जातो. ही गोदामे प्रामुख्याने हडपसर व कात्रज भागात असल्याची माहिती कळते आहे.’’
या गोदामांवरील कारवाईकडे आता अन्न विभागाचे लक्ष लागले आहे. तपासणी मोहिमेत आतापर्यंत पुणे विभागातून आंबे, इतर फळे आणि भाज्यांचे एकूण ३७ नमुने घेण्यात आले आहेत. यात पुण्यातून आंब्यांचे ३ नमुने घेण्यात आले असून सांगलीतून २ तर सोलापूरहून १ नमुना घेण्यात आला आहे. आंब्याबरोबरच सफरचंद, डाळिंब, मोसंबी, केळी या फळांचेही नमुने घेण्यात आले असून त्यांची कॅल्शियम कार्बाइडच्या वापरासाठी चाचणी होणार आहे.
अन्न विभागाने आंब्यांच्या ‘स्पॉट टेस्टिंग’साठी विशेष किट वापरण्यासही सुरूवात केली आहे. केकरे म्हणाले, ‘‘कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेला आंबा नुसता वरून बघून वेगळा ओळखता येत नाही; मात्र त्याची चव वेगळी लागते. नैसर्गिकरीत्या पिकणारा आंबा सर्व बाजूंनी एकसारखा पिकतो. कॅल्शियम कार्बाइडचा आंबा काही ठिकाणी पिकतो व काही ठिकाणी कच्चा राहतो.’’