कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कडक शिक्षा करावी, मराठा समाजाला आरक्षण मिळावे आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्यात दुरुस्ती करावी यासह विविध मागण्यांसाठी रविवारी (२५ सप्टेंबर) सकाळी साडेदहा वाजता मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांच्या तळाची व्यवस्था करण्यासाठी मोर्चाच्या मार्गावरील ६० ते ६५ मदानांची परवानगी घेण्यात आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गरवारे पुलाजवळील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुणे जिल्ह्य़ाचा मराठा क्रांती मूक मोर्चा ठीक साडेदहा वाजता सुरू होईल. या मोर्चाला जिल्ह्य़ाच्या सर्वच भागांतून मोठा प्रतिसाद मिळत असून हा मोर्चा व्यवस्थितरीत्या पार पाडण्यासाठी विविध पातळ्यांवर २२ समित्या कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.

वाहनतळ व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पाणी, स्वयंसेवक पथक, माजी पोलीस अधिकारी, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला आणि युवती अशा विविध समित्या तयार करण्यात आल्या आहेत. मोर्चादरम्यान २० रुग्णवाहिका, ५५० डॉक्टर, २०० परिचारिका, ५०० परिचर्या कर्मचारी आणि २०० मदतनीस अशी चोख व्यवस्था करण्यात आली आहे. मोर्चाच्या मार्गावर एक चौक सोडून एक अशा प्रकारे रुग्णवाहिका तैनात ठेवण्यात आल्या आहेत. तसेच टोपी परिधान केलेले २०० माजी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी प्रत्येक चौकात उपस्थित राहून मदतनीस म्हणून काम करणार आहेत. ओळखपत्र असलेले सात ते आठ हजार स्वयंसेवक हे पोलिसांना सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मदत करणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना स्वयंसेवकांची रांग असेल. बाहेर गावाहून येणाऱ्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी मोर्चाच्या मार्गावरील ६० ते ६५ मदानांची परवानगी घेण्यात आली आहे. शहरात येणाऱ्या विविध सहा रस्त्यांवर ही व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच पीएमपीच्या १२ आगरांमधून बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

एमपीएससीसह विविध बँका आणि अन्य विभागाच्या परीक्षा रविवारी आहेत. मराठा क्रांती मोर्चात सहभागी होण्यासाठी नागरिकांची गर्दी होईल. त्यामुळे परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी नऊ वाजण्याआधीच परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले. मोर्चा सकाळी साडेदहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी खबरदारी म्हणून आधी परीक्षा केंद्रावर पोहोचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maratha kranti morcha in pune