राष्ट्रवादी मोदीवादी झाले याचे नवल वाटत नाही, अशी टिप्पणी ‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’च्या नेत्या मेधा पाटकर यांनी सोमवारी केली.
राज्यामध्ये सरकार स्थापनेसाठी राष्ट्रवादीने भाजपला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्यासंदर्भात मेधा पाटकर यांनी हे मत व्यक्त केले. याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, काँग्रेसशी आघाडी करून फायदा नाही हे ध्यानात आल्यामुळे सत्तासाधूपणातून ही घोषणा करून राष्ट्रवादीवाले फसले आहेत. मतदारांनी असा कौल दिला आहे की भाजपला शिवसेनेबरोबर जावे लागेल. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्दय़ासह अनेक प्रश्नांवर या दोन्ही पक्षांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे सत्तासंपादनासाठी कोणत्या बाबतीत मतदारांना फसवून समझोता करणार हे पहावे लागेल. अल्पसंख्य समाजाच्या विकासाला प्राधान्य दिले नसल्याने हा समाज ‘एमआयएम’कडे वळाला आहे. तर, दुसरीकडे राजकीय घुसळण झाली आहे. मोदी सरकार कायदे बदलू पाहत आहे. या सरकारची धोरणे शेतकरीविरोधी आहेत. विकासाच्या नावाखाली सामान्यांना विस्थापित केले जात आहे. अशा परिस्थितीमध्ये आमच्यासारख्यांना काही काळ थांबून ‘वॉचडॉग’ची भूमिका बजवावी लागेल.
मतांच्या टक्केवारीमध्ये फारसा फरक नसताना विजयी झालेल्या जागांमध्ये फरक पडलेला आहे. त्यामुळे मतांच्या प्रमाणात लोकप्रतिनिधित्व या पद्धतीचा अवलंब करावयास हवा. तरच निवडणुकीमध्ये पैशांचे, माफियांचे, भ्रमित करणाऱ्या गोष्टींचे प्राबल्य संपुष्टात येईल, असे सांगून मेधा पाटकर म्हणाल्या, दिल्लीतील सरकार सोडण्याचा ‘आप’चा निर्णय चुकीचा होता. तसाच राज्यातील विधानसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णयही चुकीचाच होता. उत्साही, बदल घडवू पाहणाऱ्या तरुणांना झेपेल एवढा हस्तक्षेप करण्यासाठी राजकीय प्रक्रियेत सामावून घ्यायला हवे होते. ज्यांनी ‘आप’ला मते दिली त्या मतदारांना रचनात्मक कामामध्ये सहभागी करून घेण्यात पक्ष कमी पडला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दहावे द्वैवार्षिक संमेलन पुण्यात
‘जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय’चे दहावे द्वैवार्षिक संमेलन ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत पर्वती पायथा येथील राष्ट्र सेवा दल येथे होणार आहे. ‘विकासाचे राजकारण’ या विषयावर होणाऱ्या संमेलनात शिक्षणतज्ज्ञ अनिल सदगोपाल, मॅगसेसे पुरस्कारविजेत्या अरुणा रॉय, योगेंद्र यादव, विनॉय विश्वम, दयामणी बारला, प्रशांत भूषण, निखिल वागळे, िलगराज आझाद आणि पुष्पा भावे यांच्यासह १५ राज्यातील सामाजिक कार्यकर्ते सहभागी होणार आहेत, असेही मेधा पाटकर आणि सुनीती सु. र. यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medha patkar slams ncp