पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण आजपासून खंडाळा येथील बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम सुरु करण्यात आल्याने पुढील आठवडाभर येथे टप्प्याटप्प्याने काही काळासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, आज (दि.१२) येथे पंधरा मिनिटांचा पहिला मेगाब्लॉक घेण्यात आला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती महामार्गावरील खंडाळा येथील बोगद्यादरम्यान ढिल्या झालेल्या दरडींचे दगड काढण्याचे काम १२ ते २० मार्च दरम्यान करण्यात येणार आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून आज सकाळी दहा वाजता पंधरा मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.
या मेगाब्लॉकमुळे पुणे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पंधरा मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आली होती. दिवसभरात पाच टप्प्यात १५-१५ मिनिटांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे खंडाळा बोगद्याजवळ वाहतूक दिवसभरातून ५ वेळा १५ मिनिटांकरीता पुर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच १५ मार्च रोजी दुपारी सव्वा तीन वाजल्यापासून १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत वाहतूक चालू ठेवण्यात येणार आहे. याची पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन प्रवास करणाऱ्या चालकांनी आणि प्रवाशांनी नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात आले आहे.
दिवसभरात घेण्यात येणारा मेगाब्लॉक (१२ ते २० मार्च दरम्यान)
१) ब्लॉक १ – सकाळी १० ते १०.१५
२) ब्लॉक २ – सकाळी ११ ते ११.१५
३) ब्लॉक ३ – दुपारी १२ ते १२.१५
४) ब्लॉक ४ – दुपारी ०२ ते ०२.१५
५) ब्लॉक ५ – दुपारी ०३ ते ०३.१५