पुणे : यंदा र्नैऋत्य मोसमी पावसाच्या दमदार सरी बरसणार आहेत. एक जून ते ३० सप्टेंबर, या पावसाळ्याच्या चार महिन्यांत देशात सरासरीपेक्षा जास्त म्हणजे १०६ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, जगभरातील स्थिती मोसमी पावसाला पोषक आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात र्नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त, १०६ टक्के पडण्याचा अंदाज आहे. प्रशांत महासागरात सध्या एल-निनो सक्रिय असून, तो मध्यम अवस्थेत आहे. जूनच्या सुरुवातीपर्यंत एल-निनो निष्क्रिय स्थितीत जाईल आणि ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये ला-निना सक्रिय होईल. हिंद महासागर द्विध्रुविता (इंडियन ओशन डायपोल, आयओडी) सध्या निष्क्रिय आहे, तो जूनच्या सुरुवातीस सक्रिय होईल. युरोशियातील (युरोप आणि आशिया) बर्फाच्छादित क्षेत्र मार्च-एप्रिलमध्ये सरासरीपेक्षा कमी राहिले, ही सर्व स्थिती र्नैऋत्य मोसमी पावसासाठी पोषक आहे. त्यामुळे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबई, ठाण्यात उष्णतेची लाट

काही भागांत कमी पाऊस

मोसमी पावसाच्या मुख्य क्षेत्रासह म्हणजे मध्य भारतासह दक्षिण भारत, उत्तर भारतात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज असला तरीही, जम्मू-काश्मीर, लडाख, ईशान्य भारत आणि ओडिशा, छत्तीसगड, झारखंड आणि पश्चिम बंगालच्या काही भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात र्नैऋत्य मोसमी पावसाचा सुधारित अंदाज जाहीर केला जाईल, त्यावेळी महिनानिहाय पावसाची शक्यता जाहीर केली जाईल, असेही महापात्रा म्हणाले.

यंदा र्नैऋत्य मोसमी पाऊस सरासरीपेक्षा जास्त, १०६ टक्के पडण्याचा अंदाज आहे. मे अखेरीस सुधारित अंदाज जाहीर केला जाईल. त्यावेळी महिनानिहाय पावसाच्या अंदाजासह देशातील मोसमी पावसाच्या प्रगतीचा अंदाजही जाहीर केला जाईल.

– डॉ. मृत्युंजय महापात्रा, महासंचालक भारतीय हवामान विभाग

लानिनात चांगला पाऊस

●ला-निनाच्या काळात आजवर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचे निरीक्षण आहे. १९७४ ते २००० या काळात २२ वेळा ला-निना स्थिती सक्रिय होती.

●या २२ वर्षांत मोसमी हंगामाच्या सुरुवातीस एल-निनो स्थिती जाऊन, ला-निना स्थिती आल्याची घटना नऊ वेळा झाली आहे.

●ला-निना काळात र्नैऋत्य मोसमी पाऊस सरासरी वेळेत केरळमध्ये दाखल होऊन, सरासरी वेळेत देशभरात पोहोचतो.