पुणे : ‘स्वस्त आणि सुरक्षित’ प्रवासाचा आनंद घेता यावा म्हणून शाळा – महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) सुमारे एक हजार नवीन बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रविवारी ही घोषणा केली.

दरवर्षीप्रमाणे हिवाळी सहलीसाठी शाळा महाविद्यालयांच्या सहली पर्यटन स्थळी जात असतात. ‘एसटी’ च्या माध्यमातून शालेय सहलीसाठी एकूण प्रवासी शुल्कात ५० टक्के सवलत देण्यात येते. त्यामुळे अतिशय माफक दरामध्ये विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांवर सुलभ प्रवास करता येतो. मात्र, अनेकदा या बस खराब असल्याने किंवा मोडकळीस आल्याने विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान त्रास होतो. किंवा तांत्रिक दुरुस्ती अभावी बंद पडण्याच्या घटना घडतात. परिणामी सहलीच्या आनंदावर विरजण पडते. विद्यार्थ्यांचा सहलीचा आनंद द्विगुणीत व्हावा म्हणून एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या बस या शालेय सहलीसाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे सरनाईक यांनी सांगितले.

सरनाईक म्हणाले, ‘राज्यभरातील एसटी महामंडळाच्या २५१ आगारांमधून दररोज ८०० ते १००० बसेस विविध शाळा- महाविद्यालयांना सहलीसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. नेहमीप्रमाणे ५० टक्के सवलत कायम राहणार आहे. शाळा महाविद्यालयांनी खासगी वाहनाऐवजी एसटी महामंडळाच्या सुलभ आणि सुरक्षित प्रवासासाठी आगाऊ नोंदणी करणे आवश्यक आहे.’

त्यानुसार राज्यातील प्रत्येक आगाराच्या कार्यक्षेत्रातील शाळा- महाविद्यालयांना दररोज एसटी बसेस उपलब्ध करून देण्यात बाबत नियोजन करावे. आगारप्रमुख, स्थानकप्रमुख स्वतः शाळा -महाविद्यालयाच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलीचे आयोजन करण्यासाठी आवाहन करतील, अशा सूचनाही सरनाईक यांनी दिल्या.

मागील वर्षी ९२ कोटी नफा

मागील वर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी दरम्यान राज्यभरातील विविध शाळा- महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटी महामंडळाने तब्बल १९ हजार ६२४ बस उपलब्ध करून दिल्या होत्या. या माध्यमातून एसटीला तब्बल ९२ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.

शाळांना व्यवस्थापनात मदत

शाळा महाविद्यालयांना प्रेक्षणीय धार्मिक किंवा पर्यटन स्थळांवर जाण्यासाठी एसटी महामंडळाकडून सवलती बरोबर पर्यटन स्थळांचे मार्गदर्शन आणि विशेष नियोजन, व्यवस्थापन या सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शाळा महाविद्यालयांना पर्यटनाचे ठिकाण तेथील सुविधा लागणारा वेळ व्यवस्थापन यासाठी मोठी मदत होईल, असे सरनाईक यांनी नमूद केले.