पिंपरी- चिंचवड शहरातील सांगवीमध्ये झालेली हत्या ही टोळीयुद्धातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. दीपक कदम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. कदमची रात्री दहाच्या सुमारास अज्ञात दोघांनी तीन गोळ्या झाडून हत्या केली. आरोपी हे दुचाकीवरून पसार झाले. या हत्येची संशयाची सुई ही रेहान शेखच्या टोळीशी जोडली जात आहे. त्या दिशेने पोलीस आणि गुन्हे शाखा तपास करत असून एका संशयितला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. तसेच, योगेश जगतापच्या हत्येशी काही संबंध आहे का? याचे देखील धागेदोरे तपासले जात आहेत. दीपक कदम याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

हत्या झालेला दीपक कदम हा टपरीवरून खायचं पान घेऊन घरी जात होता. तेव्हाच, बेसावध असलेला कदम याच्यावर दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने पाठीत दोन आणि डोक्यात एक गोळी झाडून हत्या केली. काही कळायच्या आत तेथून दोन्ही आरोपी पसार झाले. अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी हत्या झाल्याने सांगवी आणि पिंपळे गुरवमध्ये खळबळ उडाली. तात्काळ सांगवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कदमला रुग्णालयात घेऊन जाण्यात आलं. पण, तोपर्यंत फार उशीर झाला होता.

हेही वाचा – Pune Porsche Crash: रक्त चाचणीच्या फेरफारात आईचाही समावेश, आरोपीच्या जागी आईने रक्त दिले

हेही वाचा – Porsche Accident: पोर्श अपघात प्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया, “कुणालाही सोडणार नाही, लवकरच..”

या घटनेचा सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखा समांतर तपास करत आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी रेहान शेखची वाकड परिसरात हत्या करण्यात आली होती. यात ढमाले टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांचा आहे, तसा तपासही पोलीस करत आहेत. ढमाले टोळी फरार आहे. दरम्यान, ढमाले टोळीसोबत दीपक कदम असायचा त्यामुळे त्याचाही रेहानच्या हत्येत सहभाग असल्याच्या संशयावरून रेहान शेखच्या टोळीच्या सदस्यांनी हत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. या सर्व घटनेचा योगेश जगतापच्या हत्येशीही काही संबंध आहे का? याचा देखील पोलीस तपास करणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.