Porsche Accident Update News : पुण्यातल्या प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिकाच्या मुलाने मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया या दोघांनाही उडवलं. या दोघांचाही अपघातात मृत्यू झाला. ताशी १६० किमीच्या वेगात हा अल्पवयीन मुलगा पोर्श कार चालवत होता. १९ मेच्या पहाटे ही घटना घडली. या घटनेचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. या प्रकरणात सुरुवातीला मुलाला जामीन मिळाला होता. मात्र या घटनेबाबत रोष व्यक्त झाल्यानंतर या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली. तसंच या मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात जे दोषी आहेत त्यापैकी कुणालाही सोडणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
१९ मेच्या पहाटे काय झालं?
पुण्यात १९ मेच्या पहाटे मद्यधुंद अवस्थेत पोर्श ही कार चालवत एका बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बाईकवरुन घरी जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्टा या दोघांना उडवलं. या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला. यानंतर या अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. मात्र १५ तासांत त्याला जामीन मिळाला. १५ तासांत त्याला जामीन मिळाल्यानंतर सोशल मीडिया आणि समाजात संताप व्यक्त झाला. १९ तारखेपासून या घटनेवर विविध पडसाद उमटत आहेत. समाजात हा विषय चर्चिला जातो आहे. अशात या मुलाच्या वडिलांना आणि आजोबांना अटक करण्यात आली आहे. तर मुलाची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणात राजकीय आरोप होत आहेत. मात्र देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले यांनी नेमकं काय म्हटलं ?
पुणे पोर्श अपघात प्रकरणात सापळे कमिटीची निर्मिती राज्य सरकारने केली. मात्र डॉ. सापळेंवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांच्याकडे भाडे तत्त्वावरची कार आहे. त्या कारचा देखभाल खर्च एक लाख रुपये आहे. अनेक ठिकाणी त्यांची बदली झाली होती. त्या त्या ठिकाणी त्यांनी भ्रष्टाचाराचे उच्चांक गाठले आहेत. पोर्श अपघात प्रकरणात दोषींना वाचवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. ससून रुग्णालय, पोलीस विभाग आणि राज्यकर्त्यांचे लोक यांना वाचवण्यासाठी ही कमिटी निर्माण केली गेली आहे. असा आरोप नाना पटोलेंनी केला आहे. या प्रकरणात एका आमदाराच्या मुलाचा समावेश आहे. तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आरोपीच्या पिंजऱ्यात आहेत असंही नाना पटोले यांनी म्हटलं होतं.
हे पण वाचा- Porsche Accident: “आम्ही पाहिलं ती मुलगी हवेत उडाली आणि धाडकन..”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला थरार
नाना पटोलेंनी हे आरोप केलेले असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनीही अजित पवारांवर आरोप केले. अजित पवारांनी पोलीस आयुक्तांना फोन केला होता त्यांना काय आदेश दिले ते उघड झालं पाहिजे अशी विचारणा त्यांनी केली. या सगळ्याबाबत विचारलं असता जे दोषी आहे त्यांच्यापैकी एकाचीही गय करणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“पुणे अपघात प्रकरणात योग्य प्रकारे कारवाई चालली आहे. काही लोक याचं राजकीयीकरण करत आहेत. ते कुणाच्या इशाऱ्यावर असं करत आहेत हे पण समोर येतं आहे. प्रकरण एकीकडे आहे पण या प्रकरणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकीय डाव खेळला जातो आहे ते पण समोर येतं आहे. या सगळ्यांचा पर्दाफाश होईल. तसंच पुण्याच्या प्रकरणात पहिल्या दिवशीही सांगितलं होतं तेच पुन्हा सांगतो, कुणालाही सोडणार नाही म्हणजे नाही. ” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.