जुने, घाणेरडे राजकारण करत बसलात, तर तुम्हाला सामाजिक क्षेत्रामध्ये स्थान नसेल. नवी पिढी कोणता विचार करते, हे पाहून नव्या विचारानेच येणाऱ्या काळात राजकारण करावे लागेल, असे मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या महिला मेळाव्यात ते बोलत होते. रिटा गुप्ता, शालिनी ठाकरे, शिल्पा सरपोतदार, आशा मामेडी, रूपाली पाटील, सुशीला नेटके, नीलिमा जाधव या महिला पदाधिकाऱ्यांसह आमदार शिशिर शिंदे, मनसेचे सरचिटणीस अनिल शिदोरे, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर आदी या वेळी उपस्थित होते. मेळाव्याच्या निमित्ताने रेणू गावस्कर, शीतल महाजन, संस्कृती मेनन, माधवी गायकवाड, स्नेहा राजगुरू, अंकिता गोसावी, वैष्णवी खानापुरे या विविध क्षेत्रांतील महिलांचा सन्मान करण्यात आला.
ठाकरे म्हणाले, की नवी पिढी सध्या कोणता विचार करते हे पाहण्यासाठी समाजाला कान लावा. येणाऱ्या काळात जुने राजकारण चालणार नाही. समाजात व जगात होणारे बदल तुम्हाला कळले पाहिजेत. त्यानुसार नव्या विचाराने राजकारण करावे लागले. त्यासाठी तुम्हीही बदलले पाहिजे.
महिला आरक्षणाबाबत ते म्हणाले, महिलांना आरक्षण हा शब्दच मला आवडत नाही. खुल्या गटामध्ये महिलेनेही का निवडणूक लढवू नये? पुरुष व स्त्री या दोनच जाती आहेत. जातीच्या अंगाने मी कुणाकडे पाहत नाही. मला काम हवे आहे, ते मिळणार नसेल, तर उपयोग शून्य. नवऱ्याने आरक्षणामुळे पुढे केले असेल व नंतर तोच सर्व पाहणार असेल, तर तुम्ही काय करणार. आपण सक्षम आहोत हे तुम्हाला जाणवले पाहिजे. समाजकारणात, राजकारणात काम करायचे असेल, तर जिजाऊसाहेबांचे जीवन आत्मसात केले पाहिजे. त्यांनी उद्ध्वस्त झालेली गावे उभी केली, धरणे बांधली. हे तुम्हालाही शक्य आहे. तुमच्यात ऊर्जा आहे, पण ती तुम्ही शोधत नाही. देशाला स्वातंत्र मिळून अनेक वर्षे झाली. पण, अजूनही महिलांसाठी अनेक ठिकाणी स्वतंत्र स्वच्छतागृहे नाहीत. तुमच्या हातात आता नगरसेवक, सरपंचासारखी पदे असताना आपल्या विभागात इतकी छोटी गोष्ट का होऊ शकत नाही, याचा विचार व्हावा.
‘एकही मालमत्ता माझ्या नावे नाही’
महिला कुटुंबप्रमुख झाल्या पाहिजेत, असे सांगताना राज ठाकरे म्हणाले, ‘‘माझ्या घरातही तसेच आहे. एकही मालमत्ता माझ्या नावावर नाही. जे काही आहे ते पत्नी व आईच्या नावावर आहे. कधी-कधी वाटते मी भाडय़ाच्या घरात राहतो.’’ मालमत्ता नावावर न ठेवणे म्हणजे इतर करतात, त्याप्रमाणे त्यात निवडणुकांचे काही गणित नाही, असेही स्पष्टीकरण द्यायला ते विसरले नाहीत.