विद्यार्थ्यांकडून वापर होत नसलेल्या सुविधांच्या शुल्काची आकारणी न करण्याचे निर्देश अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) देशभरातील तंत्रशिक्षण संस्थांना दिले आहेत. याचे उल्लंघन झाल्यास संबंधित संस्थांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला असून, के वळ खाणावळ आणि वाहतूक सुविधांसाठी देखभाल खर्च शुल्क आकारणी करण्याची मुभा देण्यात आली आहे. करोना संसर्गाच्या काळात महाविद्यालये बंद असतानाही शिक्षण संस्थांकडून वसतिगृह आणि वाहतूक शुल्क आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पालक आणि विद्यार्थ्यांकडून एआयसीटीईकडे करण्यात आल्या. या तक्रारींची दखल घेऊन एआयीसीईटीचे सदस्य सचिव राजीवकु मार यांनी परिपत्रकाद्वारे संलग्न शिक्षण संस्थांना शुल्काबाबतचे निर्देश दिले आहेत.
‘करोना संसर्गामुळे विद्यार्थ्यांकडून वसतिगृह आणि वाहतूक सुविधा वापर सुरू नाही. त्यामुळे शिक्षण संस्था केवळ खाणावळ आणि वाहतूक देखभालीसाठीचे शुल्क आकारू शकतात. विद्यार्थ्यांकडून ज्या सुविधांचा वापर होत आहे, त्यांचे वाजवी शुल्क आकारावे. तर ज्या सुविधांचा वापर विद्यार्थी करू शकत नाही त्यांचे शुल्क आकारता येणार नाही,’ असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी एआयसीटीईच्या अखत्यारितील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश १० नोव्हेंबरपूर्वी रद्द केल्यास त्यांना शुल्काचा पूर्ण परतावा, त्यांची कागदपत्रे सात दिवसांत परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेतला होता.