पुणे : प्रभागातील प्रश्न संबंधित क्षेत्रीय कार्यालयांच्या पातळीवर सोडविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकारात वाढ करण्याचा; तसेच महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमुळे प्रभागांचे क्षेत्रफळ वाढले असल्याने क्षेत्रीय कार्यालयांच्या संख्येत वाढ करण्याचा विचार महापालिकेने सुरू केला आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांची तसेच विविध विभागांच्या प्रमुखांची बैठक घेतली. क्षेत्रीय कार्यालयांच्या सक्षमीकरणासाठी काय केले पाहिजे, यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आलेल्या अधिकारांमध्ये वाढ करण्याबरोबर क्षेत्रीय कार्यालयांना दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये मोठी वाढ करण्याबाबत या बैठकीत चर्चा झाली.
अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज म्हणाले, महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमुळे महापालिकेची हद्द वाढली आहे. प्रभागांचे क्षेत्रफळ वाढले आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयाकडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ कमी पडते. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांचे सक्षमीकरण करताना आवश्यक मनुष्यबळ देखील उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी बैठकीत करण्यात आली. महापालिकेचे क्षेत्रफळ वाढल्याने सध्या अस्तित्वात असलेली क्षेत्रीय कार्यालये कमी पडत आहेत. त्यामुळे नवीन क्षेत्रीय कार्यालये तयार करता येतील का? याची चाचपणी बैठकीत करण्यात आली.
राज्य सरकारने क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढविण्यासाठी मान्यता दिल्यास कर्मचारी संख्याही वाढणार आहे. नागरिकांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरविण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे. ही संख्या वाढल्यास आपोआप मनुष्यबळ वाढविण्यासाठी नोकर भरती करावी लागणार आहे. त्यामुळे क्षेत्रीय कार्यालयांच्या संख्येत वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाकडून राज्य सरकारला पाठविण्याबाबत बैठकीत चर्चा झाल्याचे पृथ्वीराज यांनी सांगितले.
महापालिकेत गेल्या तीनपेक्षा अधिक वर्षांपासून नगरसेवक नाहीत. संपूर्ण कारभार हा प्रशासनाच्या हाती आहे. लोकप्रतिनिधी नसल्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. या तक्रारी क्षेत्रीय कार्यालयाच्या पातळीवर सोडविण्यात येत नसल्याने नागरिक तक्रारी घेऊन महापालिकेच्या मुख्य इमारतीमध्ये असलेल्या विभागांकडे येतात. त्यामुळे महापालिकेत गर्दी होत असल्याचे चित्र दिसते. क्षेत्रीय कार्यालयांच्या सहायक आयुक्तांना असलेले मर्यादित अधिकारी आणि कमी असलेला निधी यामुळे समस्या सुटत नसल्याची माहिती समोर आली होती. यावर तोडगा काढण्यासाठी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मंगळवारी बैठक घेत सर्व अधिकाऱ्यांशी संवाद साधून चर्चा केली.
‘क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकारात वाढ करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. मलवाहिनी (ड्रेनेज लाईन), रस्ते, अशी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता भासणारी कामे मुख्य विभागाकडून केली जातील. या कामांची देखभाल दुरुस्ती ही क्षेत्रीय कार्यालयांकडून करण्याचे नियोजन केले जात आहे. महापालिका प्रशासनाकडून पुरेसा निधी क्षेत्रीय कार्यालयांना उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच तातडीची कामे करण्यासाठी प्रतीक्षा यादीत निविदा प्रक्रिया ठेवली जाणार आहे, जेणेकरून आवश्यक कामे करण्यासाठी नव्याने निविदा काढण्याचा वेळ जाणार नाही,’ असेही पृथ्वीराज बी. पी. यांनी सांगितले.
महापालिकेचे क्षेत्रफळ वाढल्याने क्षेत्रीय कार्यालयांवर त्याचा भार येतो. नागरिकांचे प्रश्न तसेच विकासाची कामे तातडीने मार्गी लागावीत, यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या क्षेत्रीय कार्यालयांची संख्या वाढविण्याचा प्रयत्न आहे. राज्य सरकारकडे याबाबत प्रस्ताव पाठविला जाणार आहे. – पृथ्वीराज बी. पी. अतिरिक्त आयुक्त, पुणे महापालिका