आपल्या देशात तंबाखूच्या व्यसनाची व्याप्ती इतकी मोठी आहे, की आपला देश हा ‘तोंडाच्या कर्करोगाची जगाची राजधानी’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. इतकेच नाही, तर तंबाखू या व्यसनाच्या जोडीने विविध प्रकारची व्यसने केवळ तरुण पिढीलाच नाही, तर शालेय वयातील मुलांना गिळंकृत करीत आहेत. याला आळा घालण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना राबवणे आवश्यक आहे, या अनुषंगाने ‘पेस ग्रुप, पुणे’ या सामाजिक संस्थेच्या अध्यक्ष आणि कान-नाक-घसा तज्ज्ञ डॉ. वंदना जोशी यांच्याशी श्रीराम ओक यांनी साधलेला संवाद…

व्यसनाबाबत जनजागृती करावी, असे कधी जाणवले?

– जबड्याच्या कर्करोगामुळे आयुष्याला कंटाळलेला एक रुग्ण ओपीडीमध्ये बायकोला खाणाखुणा करीत मला काही तरी विचारण्यासाठी विनवत होता. त्याच्यावर तीन शस्त्रक्रिया, उपचार असे सगळे करूनही चौथ्यांदा कर्करोग उद्भवला होता. या विकतच्या रोगाने तो रुग्ण त्रस्त झाला होता. या मरणयातनांतून कायमची सुटका करावी म्हणून हात जोडत होता. कान-नाक-घशाच्या व्याधी असणाऱ्या अनेक रुग्णांना मी बरे केले होते. पण, या व्याधीचे रुग्णही वाढताना दिसत होते आणि त्यांच्या यातनाही इतर रुग्णांच्या तुलनेत सर्वाधिक होत्या. त्या यातनांनी मला कुठे तरी अंतर्बाह्य हेलावले आणि ही रुग्णसंख्या कमी करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता आणि व्यसनविरोधी अभियान सुरू करण्याचे ठरवले. त्यातून २०११ मध्ये संस्था अस्तित्वात आली. या कामात माझ्या वैद्यकीय क्षेत्रातील सहकाऱ्यांबरोबर विचारविनिमय करून, सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांच्या मदतीने ‘प्रतिज्ञा’ या लघुपटाची निर्मिती झाली.

व्यसनविरोधी अभियान कशा प्रकारे राबवता?

– पुण्यातील विविध शाळांमध्ये ‘प्रतिज्ञा’ या लघुपटासह, ‘वळण’ या चित्रपटाचे सादरीकरण, मुलांशी संवाद साधत त्यांना व्यसनांच्या दुष्परिणामाविषयी माहिती देणे आणि व्यसनांपासून दूर राहण्याची शपथ मुलांकडून वदवून घेणे अशा प्रकारे ही जनजागृती केली जाते. साधारणपणे एक ते दीड तासाचा हा कार्यक्रम असतो. २०१३ मध्ये नगर शहरवासीय मंडळ आमच्याशी जोडले गेले आणि हे जनजागृतीचे कार्य अधिक वेगाने सुरू झाले. २०१६ मध्ये योगेश जाधव व मयुरेश जोशी यांनी आमच्या अभियानाकरता ‘वळण’ ही नितांत सुंदर फिल्म बनवली. आता पुण्यासह अकराहून अधिक जिल्ह्यांमध्ये व्यसनांविषयी जागृतीचे कार्य सुरू आहे. यासाठी शेकडो स्वयंसेवकांच्या मदतीने ही जनजागृती केली जाते. त्याचे उत्तम परिणामही दिसत आहेत. इतके स्वयंसेवक असूनही व्यसनाधीनता वाढवणारी प्रलोभने वाढत आहेत. त्यामुळे आहेत ते स्वयंसेवक आणि कार्य अधिक व्यापक प्रमाणात करण्याची गरज वाटल्यामुळे आता यात विविध शाळांमधील शिक्षकांचा अंतर्भाव आम्ही केला आहे. या कार्यात माजी शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी केलेले सहकार्य मोलाचे आहे. त्यांच्यासह आमच्या संस्थेच्या समन्वयक अश्विनी तांबे, अविनाश आणि अनुया चाबुकस्वार हे सातत्याने या अभियानात कार्यरत आहेत.

शिक्षकांच्या माध्यमातून हे कार्य कसे चालते?

– सर्व शहरांच्या कानाकोपऱ्यात आणि खेडोपाडीसुद्धा व्यसनविरोधी उपक्रम चालवायचे, तर तेवढ्या प्रमाणात स्वयंसेवक उपलब्ध होत नाहीत. दुसरी गोष्ट, मुलांच्या मनापर्यंत आणि वेळप्रसंगी त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचण्यासाठी शिक्षकांची मोलाची मदत होते. यासाठी उत्कटतेने काम करणारा आणि निर्व्यसनी शिक्षक त्या त्या शाळेतील मुख्याध्यापकांच्या माध्यमातून उद्याच्या आरोग्यसंपन्न पिढीसाठी मोलाची कामगिरी करू शकतो. मुले जर व्यसनाधीनतेकडे ओढली जात असतील, तर ते शिक्षकांच्या नजरेस पटकन येऊ शकते. त्यामुळे मुलांनी व्यसनाधीनतेपासून दूर राहावे, यासाठी शिक्षकांना कार्यशाळांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. नुकत्याच सुरू झालेल्या या उपक्रमाची गरज शाळांना समजल्यामुळे अनेक शाळा या उपक्रमात सहभागी होत आहेत. आजपर्यंत चारशेहून अधिक शिक्षकांनी यात प्रशिक्षण घेतले असून, अधिकाधिक शिक्षकांपर्यंत, पर्यायाने मुलांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न आहे. घरात वडीलधारी मंडळी जर तंबाखूचे सेवन वा इतर काही व्यसने करत असतील, तर मुलेही व्यसनाकडे आकृष्ट होऊ शकतात. त्यामुळे पालकांचा सहभाग मिळाला, तर आपल्या देशाची ओळख ‘आरोग्याची राजधानी’ म्हणून करून देऊ शकतो. आमची ‘वळण’ फिल्म पालक सभेमध्ये पालकांना दाखवण्याचा परिणाम फार चांगला होऊ शकतो, असा आम्हाला विश्वास वाटतो.

shriram.oak@expressindia.com