मॉल, मल्टिप्लेक्सच्या आवारातील पार्किंगच्या जागेचा व्यावसायिक वापर

बांधकामाची मंजुरी घेण्यापुरती पार्किंगची जागा दाखविली जाते. मात्र नंतर त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर करण्यात येतो. शहरात अनेक चित्रपटगृहे, मॉल, मल्टिप्लेक्सच्या आवारातील पार्किंगचा जागेचा वापर व्यावसायिक कारणांसाठी होतो. पार्किंगच्या जागेऐवजी तेथे उपाहारगृहे सुरू करण्यात येतात. या पाश्र्वभूमीवर आता वाहतूक पोलिसांकडून पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील विविध चित्रपटगृहे, मॉल तसेच मल्टिप्लेक्सच्या आवारातील जागांची झाडाझडती घेण्यात येणार आहे.

विकास नियंत्रण नियमावलीनुसार (डीसी रुल्स) मल्टीप्लेक्स, चित्रपटगृहे आणि मॉलच्या आवारातील जागा वाहने लावण्यासाठी राखीव ठेवणे आवश्यक आहे. या नियमावलीचे उल्लंघन करून शहरातील अनेक मल्टिप्लेक्स, चित्रपटगृहे, मॉलच्या आवारातील जागांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला गेला आहे. महापालिका आणि वाहतूक पोलिसांच्या निदर्शनास हे प्रकार आले नसल्यामुळे अनेकांनी पार्किं गचा जागेचा वापर व्यवसायासाठी केला. मात्र, वाहतूक पोलिसांकडून लवकरच शहरातील प्रत्येक मॉल, चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्समधील पार्किंगच्या जागेची पाहणी करण्यासंदर्भात मोहीम राबविण्यात येणार आहे.

वाहतूक पोलिसांकडून शहरातील साठ चित्रपटगृहचालक आणि मल्टिप्लेक्स व्यवस्थापकांची बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली होती. चित्रपट आणि मल्टिप्लेक्सच्या व्यवस्थापकांना सूचना देण्यात आल्या. मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांच्या आवाराची वाहतूक पोलिसांकडून येत्या काही दिवसांत पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील टप्प्यात शहरातील विविध मॉलच्या आवाराची पाहणी करण्यात येणार आहे. ज्या मॉल, चित्रपटगृह, मल्टिप्लेक्स चालकांकडून पार्किं गच्या जागेचा वापर व्यावसायिक वापरासाठी करण्यात येईल. अशांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना दिली.

कारवाईचे निमित्त का?

शहरातील अनेक मॉल, मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांच्या आवारात वाहने लावण्यास जागा नसल्यामुळे वाहने रस्त्यावर लावली जातात. काही मॉल, चित्रपटगृहांच्या आवारातील पार्किंगची क्षमता पूर्ण झाल्यानंतर वाहनचालक  नजीकचे छोटे रस्ते, गल्लय़ांमध्ये त्यांची वाहने लावतात. त्यामुळे रस्त्यांवर कोंडी होती. विशेषत: चित्रपटाचा खेळ संपल्यानंतर रस्त्यावर वाहनांची कोंडी होती. याबाबत अनेकांनी वाहतूक पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत.

विकास नियंत्रण नियमावलीच्या आधारे कारवाई

वाहतूक पोलिसांकडून पहिल्या टप्यात शहरातील मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांच्या आवारातील जागांची पाहणी करण्यात येणार आहे. महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीचा आधार घेऊन पोलिसांकडून ही कारवाई करण्यात येणार आहे. ज्या मल्टिप्लेक्स आणि चित्रपटगृहांच्या आवारातील पार्किंगच्या जागांचा वापर व्यावसायिक कारणांसाठी केला असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.