प्रभाग क्रमांक १७ चिंचवडेनगर-बिजलीनगर-वाल्हेकरवाडी-दळवीनगर

काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष व ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांचे राजकीय भवितव्य ठरवणारा हा प्रभाग आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादीत दाखल झालेल्या भोईर यांनी खुल्या आणि ओबीसी अशा दोन्ही गटात दावा सांगितला आहे. ते कोणत्या गटातून लढतात, यावर प्रभागातील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.

चिंचवडेनगर, बिजलीनगर, वाल्हेकरवाडीचा काही भाग, प्रेमलोक पार्क, दळवीनगर, गिरिराज, शिवनगरी असे नव्या प्रभागाचे क्षेत्र आहे. सहा नगरसेवकांचे क्षेत्र मिळून नवा प्रभाग तयार करण्यात आला आहे. दाट लोकवस्ती, सोसायटय़ा, झोपडपट्टी अशा संमिश्र प्रभागात सर्वसाधारण, ओबीसी आणि सर्वसाधारण महिला गटासाठी दोन जागा असे आरक्षण आहे. भोईर यांच्याकडे ओबीसी दाखला असून ते खुल्या गटातही इच्छुक आहेत. बुधवारी पुण्यात भोइरांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्याचा या प्रभागात फायदाच होईल. गेल्या वेळी भोईर ओबीसी प्रवर्गातून काँग्रेसतर्फे लढले, तेव्हा भाजपच्या नामदेव ढाके यांनी कडवी झुंज दिली, मात्र, ‘सर्वाचे उमेदवार’ असल्याने भोईर निवडून आले. मात्र, सहकारी उमेदवार विद्या नवले यांना ते निवडून आणू शकले नाहीत. अजित पवार यांच्याशी असलेले भोइरांचे सख्य पाहता प्रभागातील अन्य उमेदवार भोइरांच्या मर्जीने ठरतील, हे उघड आहे. स्वत: भोईर कोणत्या गटातून लढणार याविषयी त्यांनी संभ्रमावस्था ठेवली आहे. प्रभागात याच मुद्दय़ावरून उत्सुकता आहे. भोईर ज्या गटात जातील, तो सोडून दुसऱ्या गटात इच्छुकांची गर्दी होईल, असे चित्र आहे. नामदेव ढाके, श्रीधर वाल्हेकर, सचिन चिंचवडे, बाळासाहेब वाल्हेकर, लाला चिंचवडे, नरेंद्र भोईर आदी भवितव्य आजमावत आहेत. भाजपमध्ये जाऊन भ्रमनिरास झालेले माजी नगरसेवक राजेंद्र साळुंके पुन्हा राष्ट्रवादीत परतले आहेत. ते ओबीसी गटातून इच्छुक आहेत.

महिला गटात नगरसेविका आशा सूर्यवंशी यांच्यासह गेल्या वेळी १३ मतांनी पराभूत झालेल्या मोना कुलकर्णी, माजी नगरसेवक रघुनाथ वाघ यांच्या पत्नी रजनी, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भगवान वाल्हेकर यांच्या पत्नी मंगल, माजी विरोधी पक्षनेते तानाजी वाल्हेकर यांच्या पत्नी शोभा तसेच करुणा शेखर चिंचवडे, ज्योती संदीप भालके आदी उमेदवार महिला गटातून भवितव्य आजमावून पाहत आहेत. पिंपरी प्राधिकरणाशी संबंधित प्रश्न व अनधिकृत बांधकामांमुळे निर्माण झालेल्या समस्यांचा निवडणुकीत प्रभाव राहणार आहे.