पिंपरी : शासकीय वसतिगृहात बाहेरून पिझ्झा मागविलेल्या विद्यार्थिनीचे वसतिगृह बदलण्यात आले आहे. वसतिगृह बदलून देण्यासाठी विद्यार्थिनीने समाजकल्याण विभागाच्या आयुक्तांकडे अर्ज केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मोशी येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील एका खोलीत पिझ्झाचे रिकामे खोके आढळले होते. वसतिगृहात बाहेरील खाद्यपदार्थ मागवण्यास मनाई असल्याने वसतिगृह प्रशासनाकडून संबंधित विद्यार्थिनींना नोटीस देण्यात आली. तसेच, पिझ्झा कोणी मागवला याबाबत सांगितले नाही, तर एक महिन्यासाठी वसतिगृहातून काढले जाईल, अशी नोटीस दिली होती. त्यामुळे एका विद्यार्थिनीने पालकांना बोलावून १० फेब्रुवारी रोजी समाजकल्याण आयुक्तांची भेट घेतली. विद्यार्थिनीने वसतिगृह बदलून देण्याची मागणी केली.

महाविद्यालय आणि मोशी येथील वसतिगृह हे अंतर जास्त असल्याने त्या विद्यार्थिनीला दररोज ये-जा करण्यासाठी अडचणीचे ठरत होते. त्यामुळे तिला विश्रांतवाडी, येरवडा येथील मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश बदलून देण्यात आला आहे.

संबंधित विद्यार्थिनीने वसतिगृह बदलून देण्यासाठी अर्ज केला होता. मोशी येथील वसतिगृह आणि तिचे महाविद्यालय हे अंतर लांब असल्याने तिच्या सोयीसाठी विनंतीनुसार वसतिगृह बदलून देण्यात आले आहे, असे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri change in hostel for female students in pizza case pune print news ssb