पिंपरी : आगामी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना साेमवारी प्रसिद्ध करण्यात आली. प्रभाग क्रमांक एक चिखली, सहा धावडेवस्ती, सात गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाण आणि प्रभाग क्रमांक १२ तळवडे गावठाण या प्रभागातील हरकती पूर्णतः आणि २४ व २५ या दाेन प्रभागातील हरकतींची अंशतः दखल घेऊन प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. तीन प्रभागांच्या नावात वाढ करण्यात आली आहे.

महापालिकेची निवडणूक २०१७ प्रमाणेच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने होणार आहे. सन २०११ च्या १७ लाख २७ हजार ६९२ लोकसंख्येप्रमाणेच अंतिम प्रभागरचना तयार केली. ३२ प्रभाग असून १२८ नगरसेवकांची संख्या असणार आहे. निवडणूक आयाेगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभागरचनेमध्ये प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाणमधील ताम्हाणे वस्ती हा भाग प्रभाग क्रमांक १२ मध्ये तळवडे गावठाण, रूपीनगरला जाेडण्यात आला आहे.

प्रभाग क्रमांक सहा धावडेवस्ती, चक्रपाणी वसाहतमधील गावजत्रा मैदान, महापालिका रुग्णालय परिसर हा भाग अंतिम प्रभागरचनेत प्रभाग क्रमांक सात गव्हाणे वस्ती, भोसरी गावठाणमध्ये जोडण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक २४ दत्तनगर, पद्मजी पेपरमिल, गणेशनगरमधील म्हातोबा वस्ती झोपडपट्टी परिसर प्रभाग क्रमांक २५ पुनावळे, ताथवडेला जोडण्यात आला आहे.

तीन प्रभागांच्या नावात वाढ

प्रभाग क्रमांक दहा शाहूनगर, संभाजीनगर, इंदिरानगर, विद्यानगर, लालटोपीनगर, मोरवाडीत समाविष्ट असलेल्या अण्णासाहेब मगरनगर, टिपू सुलताननगर, बीएसएनएल परिसर, एमआयडीसी कार्यालय परिसराचे नाव समाविष्ट केले आहे. प्रभाग क्रमांक ११ कृष्णानगर, नेवाळेवस्ती, पूर्णानगर, घरकुल योजना, अजंठानगर प्रभागाच्या नावात भीमशक्तीनगर आणि प्रभाग क्रमांक २६ पिंपळे निलख, कस्पटेवस्तीच्या नावात वाकडचा समावेश करण्यात आला आहे.

३१२ हरकती फेटाळल्या

महापालिकेच्या प्रभागरचनेवर ३१८ हरकती आल्या होत्या. त्यांपैकी प्रभाग क्रमांक एक, सहा, सात, १२, २४ आणि २५ या प्रभागांमधील हरकती स्वीकारल्या आहेत. उर्वरित ३१२ हरकती अमान्य केल्या आहेत.

प्रभाग क्रमांक एक सर्वाधिक लोसंख्येचा

महापालिका निवडणुकीसाठी ३२ प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभाग किमान ४९ ते कमाल ६५ हजार लाेकसंख्येचा असणार आहे. प्रभाग क्रमांक एक चिखली गावठाण भाग, पाटीलनगर, गणेशनगर, मोरेवस्ती भाग, सोनवणे वस्ती हा सर्वाधिक ६५ हजार ३२० तर सर्वात कमी लाेकसंख्येचा प्रभाग क्रमांक पाच गवळीनगर, चक्रपाणी वसाहत ४९ हजार ४९ लोकसंख्येचा आहे. महापालिका निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचनेची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. राज्य शासन, राज्य निवडणूक आयाेगाच्या सूचनेनुसार पुढील कार्यवाही केली जाईल, असे निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त अविनाश शिंदे यांनी सांगितले.