पिंपरी : महापालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाने थकबाकी असलेल्या ५२० मालमत्तांचा लिलाव जाहीर केला आहे. थकबाकीदारांना थकबाकी भरण्यासाठी पाच मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यास मालमत्तांचा लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

करसंकलन विभागाकडून जप्ती मोहीम डिसेंबर २०२४ पासून तीव्र करण्यात आली. थकबाकी असलेल्या ८७७ मालमत्ता लाखबंद (सील) करून जप्त करण्यात आल्या. त्यात बिगरनिवासी, व्यावसायिक व मिश्र अशा मालमत्तांचा समावेश आहे. आतापर्यंत ३५७ मालमत्ताधारकांनी थकबाकी भरली आहे. या मालमत्तांची लाखबंदीची कारवाई मागे घेण्यात आली आहे. उर्वरित ५२० मालमत्तांची लिलावाची प्रक्रिया सुरू केली आहे. थकबाकीदारांना देयक भरण्यासाठी पाच मार्चपर्यंत अंतिम मुदत दिली आहे. जे कराचा भरणा करणार नाहीत, अशा मालमत्ताकरावर अधिकचा १५ टक्के लिलाव खर्च लावण्यात येणार आहे.

प्रत्यक्ष लिलाव प्रक्रिया सुरू झाल्यानंतर मालमत्ताधारकांना लिलावातून वाचवण्यासाठी मर्यादित संधी असणार आहे. मालमत्ताधारकांनी लिलावाची जाहीर सूचना प्रसिद्ध होईपर्यंत तत्काळ संपूर्ण थकीत कराचा भरणा करून लिलावप्रक्रिया टाळावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांनी केले आहे.

आता थकबाकीदारांच्या मालमत्तांची लिलावाची प्रक्रिया सुरु करणार

शहरामध्ये मालमत्ताकराची थकबाकी असणाऱ्या मालमत्तांवर जप्तीची कारवाई सुरु असून तात्काळ कर भरुन जप्तीची कारवाई टाळण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. जप्त केलेल्या मालमत्तांपैकी ज्या मालमत्ताधारकांनी अद्यापही कराचा भरणा केला नाही अशा मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया सुरु करणेत आली आहे. ज्या मालमत्ताधारकांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत अशा मालमत्ताधारकांनी थकीत कराचा संपूर्ण भऱणा पाच मार्च २०२५ पूर्वी करुन आपल्या मालमत्तेचा लिलाव टाळावा, असेही आवाहन जांभळे यांनी केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipal corporation pending property tax last date 5th march 2025 pune print news ggy 03 css