पुणे : पुणे महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारावी, यासाठी महापालिकेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महापालिकेच्या ७५ शाळा ‘मॉडेल स्कूल’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी घेतला आहे.

शिक्षणाचा दर्जा सुधारावा तसेच खाजगी शाळेत मिळणारे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्हा परिषद शाळा मॉडेल स्कूल बनविण्याचा निर्णय घेतला आहे. याच पद्धतीने पुणे महापालिकेच्या शाळा देखील मॉडेल स्कूल करण्याचा संकल्प महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी केला आहे.

याबाबत अधिक माहिती देताना महापालिका आयुक्त राम म्हणाले, महापालिकेच्या मॉडेल स्कूल या शाळा सर्वच गोष्टींमध्ये मॉडेल असतील, अशी पद्धतीने विकसित केल्या जाणार आहेत. तसेच, महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमधील शाळांच्या इमारतींमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.

महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी  शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये शिक्षण मंडळाच्या शाळांच्या इमारती, खेळांची मैदाने, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयीसुविधांची, शिक्षकांची सविस्तर माहिती घेतली. या बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती आयुक्त राम यांनी पत्रकारांना दिली. महापालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक सुधारणांवर लक्ष केंद्रीत करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या ७५ शाळांवर लक्ष केंद्रीत करून मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

महापालिकेच्या शाळांच्या इमारती आणि मैदाने केवळ चांगली असून चालणार नाही. तर, तेथील शिक्षणाचा दर्जाही उंचावण्याला अग्रक्रम महापालिका प्रशासनाचा असला पाहिजे. शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी यापूर्वी अनेक प्रयत्न झाले आहेत. त्यामधील चांगल्या बाबींचा समावेश करून विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक विकासावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल. लवकरच या संदर्भातील सविस्तर आराखडा तयार करून शिक्षण मंडळामार्फत याची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल, असे आयुक्तांनी यांनी सांगितले.

‘महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३२ गावांतील शाळा महापालिकेकडे वर्ग झाल्या आहेत. या शाळांच्या इमारतींची स्थिती फारशी चांगली नाही. या शाळांच्या इमारती आणि मैदाने विकसित करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येणार आहे. शाळांमधील पिण्याचे पाणी आणि स्वच्छतागृहांची परिस्थिती सुधारण्यावर भर देण्यात येईल,’ असे राम यांनी सांगितले.