पुणे : गुईलेन बॅरे सिंड्रोमच्या (जीबीएस) उद्रेकानंतर शहरातील पाणी नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यास झालेल्या प्रारंभात खंड पडला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पत्र पाठवूनही गेल्या दोन महिन्यांपासून पाणीपुरवठा विभागाने तपासणीसाठी नमुने प्रयोगशाळेकडे पाठविलेलेच नाहीत.

पुण्यात ९ जानेवारीपासून जीबीएस उद्रेक होऊन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली होती. सिंहगड रस्ता परिसरात हा उद्रेक झाला होता. दूषित पाण्यामुळे हा उद्रेक झाल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले होते. त्या वेळी पुण्यात जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले होते. त्यात पुणे महापालिका ४६, महापालिकेत नव्याने समाविष्ट गावे ९५, पिंपरी-चिंचवड महापालिका ३४, पुणे ग्रामीण ४० अशी रुग्णसंख्या होती. ‘जीबीएस’मुळे १२ जणांचा मृत्यू झाला होता.

दूषित पाण्यामुळे ‘जीबीएस’चा उद्रेक झाल्याने राज्याच्या आरोग्य विभागाने महापालिकेला पाणी नमुने तपासणीसाठी राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे पाठविण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर महापालिकेकडून नियमितपणे पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून पाणी नमुने तपासणीसाठी पाठविणे थांबविण्यात आले आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या आरोग्य विभागाने पाणीपुरवठा विभागाला ‘जीबीएस’च्या पार्श्वभूमीवर पाणी नमुने तपासणीसाठी राज्य प्रयोगशाळेकडे पाठविण्यासाठी वारंवार पत्रे लिहिली आहेत. तरीही, पाणीपुरवठा विभागाने त्यावर कार्यवाही केलेली नाही.

पुण्यातील जीबीएस उद्रेकानंतर पुणे महापालिकेकडून पाणी नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येत होते. गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेने पाणी नमुने तपासणीसाठी पाठविलेले नाहीत. या प्रकरणी महापालिकेला पत्र पाठविण्यात आले आहे. डॉ. विनोद फाळे, उपसंचालक, राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा

जीबीएस उद्रेकानंतर राज्याच्या आरोग्य विभागाने नागरिकांना पिण्याच्या शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला शहरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी राज्य प्रयोगशाळेत पाठविण्याबाबत पत्र लिहिले होते. – डॉ. नीना बोराडे, आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका

महापालिकेच्या स्वत:च्या प्रयोगशाळेत पाणी नमुन्यांची तपासणी केली जाते. त्यामुळे नमुने तपासणीसाठी राज्य प्रयोगशाळेत पाठविण्यात येत नव्हते. यापुढील काळात त्रयस्थ संस्थेकडून तपासणी व्हावी, यासाठी राज्य प्रयोगशाळेत पाणी नमुने पाठविण्यात येतील.– नंदकिशोर जगताप, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका