पुणे : कात्रज चौकातील गेल्या २८ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ४० गुंठे जागेचे भूसंपादन करण्यास महापालिकेला यश आले आहे. त्यामुळे या चौकातील वाहतूक कोंडी आता सुटणार आहे. या जागेसाठी महापालिकेला २१ कोटी ५७ लाख ६० हजार रुपये द्यावे लागले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कात्रजकडून कोंढवा रस्त्याकडे जाणाऱ्या मुख्य चौकात ही जागा आहे. संजय गुगळे यांच्या मालकीची ही जागा आहे. शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्यानुसार (डीपी) ३० मीटर डीपी रस्ता, आणि उद्यानासाठी ६ हजार २०० चौरस मीटर जागा बाधित होती. त्यानंतर २०१७ च्या विकास आराखडयात (डीपी) हा रस्ता ३० मीटर ऐवजी ६० मीटरचा करण्यात आला. कात्रज-कोंढवा रस्ता आणि पुणे-सातारा रस्ता या दोन्हीमध्ये ही जागा बाधित होत आहे. या जागेसाठी रोख मोबदला देण्यात यावा, यासाठी जागा मालक संजय गुगळे हे उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने त्यांना मोबदला देण्याचे आदेश दिले होते.

या जागेचे भूसंपादन २०१३ च्या नवीन कायद्यानुसार करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून या जागेच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरूच होती. विशेष भूमी संपादन अधिकारी हर्षद घुले आणि अजिक्य पाटील यांनी महापालिकेच्या भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांच्याकडे जागेच्या ताब्याची कागदपत्रे दिली. या वेळी पालिकेचे उपअभियंता दिगंबर बिगर, शाखा अभियंता रुपाली ढगे, आरेखक संतोष शिंदे उपस्थित होते.

कात्रज चौकात दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. कात्रज चौकातून कोंढव्याकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद आहे. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केले जात होते. यापूर्वी महापालिके आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळणारे माजी आयुक्त विक्रम कुमार, माजी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी ही जागा ताब्यात मिळावी, यासाठी प्रयत्न केले. ही जागा ताब्यात आल्याने रस्ता रुंदीकरण होऊन नागरिकांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.

रोख मोबदला देऊन जागा ताब्यात

कात्रज चौकातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी गुगळे यांच्या मालकीची ४० गुंठे जागा ताब्यात घेण्यासाठी महापालिका गेले अनेक वर्षांपासून प्रयत्न करत होती. ही जागा ताब्यात द्यावी, त्याच्या बदल्यात ‘हस्तांतरणीय विकास हक्क’ (टीडीआर) किंवा ‘चटई क्षेत्र निर्देशांक’ (एफएसआय) देण्याची तयारी महापालिकेने सुरुवातीपासून केली होती. यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर जागामालकाबरोबर बैठकादेखील घेतल्या जात होत्या. जागामालक गुगळे जागा देण्याची तयारी दाखवायचे; मात्र नुकसानभरपाई म्हणून रोख मोबदला द्यावा, अशी मागणी करत होते. त्यामुळे यावर निर्णय होत नव्हता. महापालिकेने सर्वांत पहिल्यांदा ही जागा ताब्यात घेण्याचा प्रस्ताव तयार केला, त्या वेळी त्याची किंमत तीन ते चार कोटी होती. मात्र, आता या जागेसाठी भूसंपादन कायद्यानुसार महापालिकेला २१ कोटी ५७ लाख रुपये द्यावे लागणार आहे. पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, कात्रज चौकातील जागा संबंधित जागामालकाने महापालिकेच्या ताब्यात दिली आहे. ही जागा मिळावी, यासाठी गेले अनेक वर्षे पाठपुरावा केला जात होता. त्याला यश आले आहे. या जागेमुळे येथे रस्तारुंदीचे काम होऊन हा चौक मोठा होणार आहे. त्यामुळे वाहतूककोंडी सुटणार आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc succeeded in acquiring 40 gunthas land in katraj chowk help to solve traffic problem ccm 82 zws