पिंपरी शहरात मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे अंतर्गत रस्त्यांची पुन्हा चाळण झाली आहे. रस्त्यांवर खड्डेच-खड्डे पडले आहेत. अवघ्या आठ दिवसात ८८८ खड्डे आढळले आहेत. त्यामुळे पुढील वर्षीपासून कंत्राटदार, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. दरम्यान, शहरात एकूण ३५४२ खड्डे आढळले होते. त्यापैकी २८३८ खड्डे बुजविले आहेत. ७०४ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा  महापालिका प्रशासनाने केला आहे.

शहरात यंदा जुलैअखेर पावसाला सुरुवात झाली. जुलै आणि ऑगस्टच्या पहिल्या पंधरवाड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील रस्त्यांची मोठी चाळण झाली होती. रस्त्यावर खड्डेच-खड्डे पडले होते. यंदा सर्वाधिक खड्डे असल्याची कबुलीही महापालिका प्रशासनाने दिली होती. प्रशासने खड्डे बुजविले. मात्र, मागील आठ दिवसात शहरात पुन्हा जोरदार पाऊस झाला. त्यामुळे रस्त्यांची चाळण झाली. शहरातील पिंपरी, चिंचवड, निगडी, भोसरी, नवी सांगवी, जुनी सांगवी, वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव,  चिखली, आकुर्डी,  परिसरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. आठ दिवसात ८८८ खड्डे आढळले. आता दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने खड्डे बुजविण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा >>>सोरायसिसवर आता प्रभावी उपचार अन् दुष्परिणामही कमी! त्वचाविकारतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…

शहरात २७ ऑगस्टपर्यंत ३५४२ खड्डे आढळले आहेत.  त्यापैंकी महापालिकेने डांबर आणि कोल्ड मिक्सने १०३२, खडीने ३०२,  पेव्हिंग ब्लॉकने १२४२, सिमेंट काँक्रिटने २६२ असे २८३८ खड्डे पूर्णतः बुजविले आहेत.  त्याचे प्रमाण ८०.१२ टक्के आहे.  शहरातील केवळ ७०४ खड्डे बुजविण्याचे बाकी असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील रस्त्यांवर सर्वत्र खड्डेच-खड्डे दिसून येतात. 

खड्यांमध्ये पाणी साचून राहते. त्यामुळे वाहन चालकाला खड्ड्याचा अंदाज येत नाही. वाहन खड्यात आदळून चालकाला तसेच वाहनाला दणका बसत आहे. खड्यांतून सुट्या झालेल्या खडीमुळे दुचाकी घसरुन अपघात होत आहे. खड्यांपासून बचावासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. परिणामी, वाहतुकीला संथ गती येत आहे. कोंडीत भर पडत आहे.

हेही वाचा >>>पुणेकर हवाई प्रवाशांना खुशखबर! पुणे विमानतळाबाबत मुरलीधर मोहोळ यांची मोठी घोषणा

कंत्राटदार, अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करणार

शहरात दोन हजार किलोमीटर अंतराचे रस्ते आहेत. मागीलवर्षी रस्ता झाला आणि पावसाळ्यात त्यावर खड्डे पडले. तर,  कंत्राटदार, उपअभियंता आणि कनिष्ठ अभियंता यांच्यावर जबाबदारी निश्चित केली जाणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. ‘जेट पॅचर’ मशीनच्या माध्यमातून खड्डे बुजविण्याचे काम वेगात सुरु आहे. लवकरच खड्डे बुजविण्याचे काम पूर्ण होईल, असे शहर अभियंता मकरंद निकम यांनी सांगितले.