पुणे : पिरंगुट येथील वीज वाहिन्या तुटल्याने भूगाव, पिरंगुट परिसरातील सुमारे २० हजार ग्राहकांचा वीजपुरवठा रविवारी दुपारी दोनच्या सुमारास खंडित झाला. सुमारे २४ तासांनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याचे ‘महावितरण’कडून सांगण्यात आले.

पिरंगूट येथे ‘एमएसआरडीसी’च्या पुलाचे काम सुरू होते. त्यासाठी संबंधित विभागाने भराव टाकून कामाला सुरुवात केली. मात्र, रविवारी दुपारी पावसाच्या पाण्यामुळे टाकलेला भराव वाहून गेला. त्यामुळे ‘महावितरण’च्या ‘२२ केव्ही स्कायआय’ वीज वाहिनी चार ठिकाणी तुटल्या. परिणामी २० हजार वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. रविवारी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते. परंतु, संततधार पाऊस आणि वाहत्या पाण्यामुळे दुरुस्ती करताना अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे दुरुस्तीचे काम तात्पुरते थांबवण्यात आले.

सोमवारी सकाळी पाणी कमी होताच दुरुस्तीच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली. पर्यायी मार्गाने वीजपुरवठा करतानाही अनेकदा व्यत्यय येत होते. मात्र, सकाळी अकरा वाजता ‘गणेशखिंड’मार्गे भूगाव परिसरातील ८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. शेवटी, सोमवारी दुपारी तीन वाजल्यानंतर ‘महावितरण’च्या कर्मचाऱ्यांनी चारही जॉईंट जोडून परिसरातील सर्व ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केल्याची माहिती ‘महावितरण’कडून देण्यात आली.

मुळशी उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता आनंद घुले, शाखा अभियंते दाम्पलवार, नितीन धस आणि मनोज काळे यांच्यासह भूगाव, भूकुम आणि खातपेवाडी येथील वीज कर्मचाऱ्यांनी दुरुस्तीचे काम केले.